पर्यावरणातील हस्तक्षेपाची मानव शिक्षा भोगत आहे - भदंत पंय्याबोधी थेरो यांचे प्रतिपादन - NNL

 येथे बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा


नांदेड|
मानवाचा पर्यावरणात कमालीचा हस्तक्षेप झालेला आहे. तमाम सृष्टीला यामुळे वातावरणात होत असलेले अपायकारक बदल सोसावे लागत आहेत. मानवाने केलेल्या चुकांची शिक्षा निसर्ग देत आहे. इथे चुकीला माफी नसते. पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे मानव शिक्षा भोगत आहे, हे थांबले पाहिजे असे प्रतिपादन तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खुरगाव नांदुसा संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. 

ते सावरगाव (पी) येथील बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात धम्मदेसना देतांना बोलत होते. धम्ममंचावर भंते धम्मज्योती थेरो ( औरंगाबाद), भदंत बोधानंद थेरो ( मुंबई), बोधीरत्न (मुंबई), महानामा (मुंबई), धम्मानंद ( मुंबई), विजयानंद ( औरंगाबाद), दीपरत्न ( अहमदनगर), नागसेन ( उदगीर), चंद्रमणी, संघरत्न, सुदर्शन, सुदत्त, श्रद्धानंद यांची उपस्थिती होती. तसेच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते दशरथ लोहबंदे, अॅड. संजय भारदे, संजय रावणगावकर, ज्योत्स्ना राठोड, प्रशांत इंगोले, संबोधी सोनकांबळे, धम्मसेवक गंगाधर ढवळे,निवृत्ती लोणे, ग्रामविकास अधिकारी ए. के. बिरु, के. एच. हसनाळकर, शांताबाई येवतीकर, हिप्परगा सरपंच कल्याण कांबळे, अरुणाताई सावरगावकर, रमाताई कांबळे, शोभा कुद्रे, संयोजक गोपीनाथ कांबळे, आशाताई कांबळे यांची उपस्थिती होती. 

तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्र पुरस्कृत बौद्ध भिक्खूंची धम्मदान व धम्मसंदेश यात्रा जिल्हाभर फिरत आहे. कालवश यशोदाबाई बाबाराव कांबळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी गोपीनाथ कांबळे यांनी मुखेड तालुक्यातील सावरगाव (पी) येथे तक्षशिला महाबोधी बुद्ध विहारात थायलंड येथून आणलेल्या बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा आयोजित केला होता. याठिकाणी संघाचे आगमन झाले. सकाळी पंचशील ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर गावातील मुख्य रस्त्यावरुन मिरवणूक काढण्यात आली. बुद्ध विहारात भिक्खू संघाच्या हस्ते बुद्ध मूर्ती स्थापन करण्यात आली.  त्यानंतर तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भिक्खू संघाला याचना केल्यानंतर उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना त्रिसरण पंचशील देण्यात आले.  भिक्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली. 

यावेळी बोलतांना भदंत पंय्याबोधी थेरो म्हणाले की, कोरोना काळाने जवळची माणसे हिरावून घेतली आहेत. माणसाच्या जीवनाचे महत्व फार कमी झाले आहे. तेव्हा उपासक उपासिकांनी बुद्ध वचनानुसार वागले पाहिजे. निसर्गचक्रातील मानवी हस्तक्षेपामुळे कोरोनासारखे जीवितास घातक विषाणू तयार झाले आहेत. धम्म विज्ञानवादी, निसर्गवादी आहे. सत्यता, प्रामाणिकपणा, विवेकाने जगणे हेच आता महत्वाचे आहे. यावेळी भदंत बोधानंद थेरो, भंते दीपरत्न, भंते धम्मज्योती थेरो यांचीही धम्मदेसना संपन्न झाली. उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना दिलेल्या भोजनदानानंतर मंजुषा शिंदे, रविराज भद्रे, मिनाक्षी कांबळे यांच्या बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यास कला, साहित्य ‌व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. कांबळे परिवाराकडून भिक्खू संघाला आर्थिक दान व चिवरदान करण्यात आले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नवतरुण युवक मित्रमंडळ सावरगाव, लहुजी सेना मित्र मंडळ, कष्टकरी महिला मंडळ, रमाई महिला मंडळ, महिला संवाद प्रतिष्ठान यांनी परिश्रम घेतले. 

आई वडिलांची सेवा करुन सत्कर्म करावे

धम्मसंदेश देत असतांना भदंत पंय्याबोधी थेरो तथागत गौतम बुद्धाचा संदर्भ देत म्हणाले की, आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला, वाढवले, शिक्षण दिले, आपल्या जीवनाचे कल्याण झाले. हे होत असताना आपण आई-वडिलांना दूर न लोटता त्यांची सेवा करुन पुण्यकर्म केले पाहिजे. गृहस्थी जीवनातील ही अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.  बुद्धाची शिकवण नितीमानतेवर आधारित आहे. सर्वांप्रती मंगल भावना व्यक्त करणारी, मंगल मैत्री जोपासणारी आहे. तेव्हा वृद्ध आई-वडील म्हणजे ओझे समजू नका. त्यांचा तिरस्कार करु नका. त्यांना सन्मानाने वागवा. आई-वडिलांच्याप्रती अथवा कोणत्याही प्रकारची कृतघ्नता बौद्ध संस्कृती शिकवत नाही. आई वडिलांची सेवा करुन सत्कर्म करावे असे आवाहन धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी उपस्थितांना केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी