उस्माननगर, माणिक भिसे| येथील विठ्ठलेश्वर मंदिरच्या वतीने मोजक्या वारकरी मंडळींनी आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी भगवी पताका, तुळस वृंदावन, घेत गावातील प्रमुख मार्गावरून भजन करीत दिंडी काढली.
मागील दोन वर्षांपासून कोरोना या महामारीच्या रोगाने अनेकांना हैराण केले आहे. कित्येक जनाचा बळी देखील गेला आहे. या रोगाच्या भीतीपोटी नागरीक घरा बाहेर न पडता आपापल्या घरीच राहाने पसंत केले होते. आजही कोरोनाची भिती बाळगत नागरीक शासनाच्या आदेशानुसार नियम पाळत आषाढी एकादशी साजरी करत टाळ मृदंगाच्या निनादाने गावात भाविकांना गावातच पंढरपूर अवतरले आहे असा अनुभव घेता आला. कोरोना नियमांचे पालन करून अनेकांनी घरीच हरिपाठ म्हणून उपवास करून आषाढी एकादशी साजरी केली.
समाज माध्यमांतून चिमुकले "वारकरी "
गावातील अनेक व्हाट्स अप ग्रुप, फेसबुक मधून घरातील लहान मुलांना वारकरी ची पोषाख करून " जय हरी " म्हणत आषाढी एकादशी निमित्ताने परस्परांना शुभेच्छा देण्यासाठी तरुणांनी उत्साह दाखवला. आळंदी व देहू येथील पालखी सोहळा, शिवशाहीच्या प्रवासाची परस्परांशी भावनिक देवघेवीं करण्यात आले. घरातच साजरे होणारे सण, उत्सव समाजमाध्यमांतून सर्वदूर पसरत असल्याने वेगळा आनंद मिळतो असे चित्र दिसून येते आहे.