लिंबोटी धरणाचे पाणी लातूरला देऊ नये - राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर -NNL

उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

नांदेड| कंधार, लोहा या दोन तालुक्यातील शेती, सिंचनासाठी अप्पर मानार धरण (लिंबोटी धरण) याची निर्मिती करण्यात आली. परंतु हे पाणी लातूरला पळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापुर्वीच लातूर आणि परभणी जिल्ह्यातील तालुक्यांना या धरणातून पाणी दिले जाते. आता परत एकदा लातूरला पाणी नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एका प्रकारे कंधार आणि लोहा या तालुक्यातील शेतकर्‍यांवर अन्याय सुरू आहे. त्यामुळे लिंबोटी धरणाचे पाणी लातूरला देऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदन केली आहे.


लिंबोटी धरणाची निर्मिती कंधार आणि लोहा तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी करण्यात आली. शेतीला मुबलक पाणी देता आले नाही, परंतु युती शासनाच्या काळात 1995-2000 जवळपास 35 टक्के पाणी इतरत्र वळवले. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरला पाणी देण्यात आले. त्यानंतर पुन्हा भाजपच्या फडणवीस सरकारने पुन्हा पालम आणि उदगीर शहराला पाणी देण्याचा निर्णय घेतला. वास्तविक पाहता देवधन तलावातील पाणी उदगीरसाठी उपलब्ध असताना लिंबोटी धरणातील पाणी उपलब्ध करून घेतले. पालम शहराला डिग्रस बंधार्‍यातून पाणी घेणे जवळचे असताना देखील लिंबोटीतून पाणी उपलब्ध करून घेतले. 


त्यामुळे लोहा-कंधार या तालुक्यामध्ये सिंचनाचे क्षेत्र घटले आहे. परत एकदा कंधार, लोहा या तालुक्यातील शेतकर्‍यांचे पाणी पळविण्याचा घाट सुरू असून लातूरसाठी पाणी पळविले जात आहे. वास्तविक पाहता लातूर शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उजनीतून पाणी आणण्याचा प्रस्ताव आहे. असे असताना लिंबोटी धरणातून पाणी घेणे उचित नाही. लिंबोटी धरणाचे पाणी लातूर जिल्ह्याला देऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.


 सकारात्मक चर्चा

लिंबोटी धरणातील पाणी यापुर्वीच इतर ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यामुळे हे पाणी लातूरला देण्यात येऊ नये या विषयावर मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी लातूरला लिंबोटीचे पाणी देणार नाही यासंदर्भात सकारात्मक चर्चा करून आश्‍वासन दिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी