महिलांनी आपल्या कामांबद्दल सदैव आत्मसन्मान बाळगणे गरजेचे - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर -NNL

कार्यालयीन ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत कार्यशाळा संपन्न



नांदेड| कोणतीही जबाबदारी पार पाडताना आत्मसन्मान तेवढाच महत्वाचा असतो. जोपर्यंत आपण हाती घेतलेल्या कामाला आत्मसन्मानाची जोड देणार नाही तोपर्यंत आपल्यावर जी जबाबदारी सोपविली आहे किंवा आपण जे काम करतो त्याबद्दल इतराच्या मनामध्ये त्या कामाप्रती सन्मान वाढणार नाही, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी महिलांच्या योगदानाला अधोरेखित केले. प्रत्येक कार्यालयात महिलांसाठी प्रशस्त वातावरण असेल व त्यांच्या मनात सुरक्षिततेची खात्री होण्यासाठी कार्यालय प्रमुखांनी योग्य ती दक्षता घेतली पाहीजे. कार्यालयात काम करणाऱ्या महिलांचा व कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या महिलांचा कुठेही अवमान होणार नाही याचीही दक्षता कार्यालय प्रमुखावर आहे याचा विसर पडता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम- 2013 व दि. 9 डिसेंबर 2013 च्या नियम अधिनियमातील तरतुदीनुसार प्रत्येक कार्यालय, आस्थापनेंतर्गत समिती गठीत करण्याबाबत आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झालेल्या या कार्यशाळेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तथा अधिनियमातील जिल्हा अधिकारी दिपाली मोतीयाळे, महिला बाल विकास अधिकारी रेखा काळम, अप्पर पोलीस  अधिक्षक निलेश मोरे, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक, डॉ. उज्वला सदावर्ते, महिला बालसंरक्षण अधिकारी विद्या आळणे, सर्व विभाग प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित होते. तर मुंबई बाल कल्याण समितीच्या ॲड. मनिषा तुळपुळे यांच्यासह तालुकास्तरावरील विभाग प्रमुखांनी या कार्यशाळेत ऑनलाईन सहभाग घेतला. 

कार्यालय, आस्थापनेच्या ठिकाणी अथवा इतरत्र जर एखाद्या महिलेला अन्यायाला सामोरे जावे लागत असेल तर या अधिनियमांतर्गत त्या महिलेला तात्काळ संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. कार्यालय प्रमुख जर जबाबदार असतील तर त्या प्रत्येक कार्यालयात कोणत्याही महिलेवर अन्याय सहन करण्याची वेळ येत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. महिलांवरील अन्यायाच्या बऱ्याच तक्रारींची चौकशी केली असता असंख्य महिला कर्मचारी या आपल्यावर झालेल्या अथवा होत असलेल्या अन्यायाची माहिती देण्यास टाळाटाळ करतात. यापेक्षा महिलांनी जे असेल ते सत्य स्पष्टपणे सांगितल्यास त्यांची सुरक्षितता अधिक वाढेल, असेही वर्षा ठाकूर यांनी आजवर विविध तपासात निघालेल्या निष्कर्ष संदर्भ देऊन सांगितले. नांदेड जिल्हा प्रशासनातील कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांची भूमिका लक्षात घेता लवकरच आपण आपला जिल्हा सुरक्षित जिल्हा म्हणून ओळख निर्माण करुयात, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. 

जिल्ह्यातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात भरोसा सेलची स्थापन करण्यात आली आहे. महिलांच्या तक्रारीवर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून तेथे कार्यवाही केली जाते, असे अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी सांगितले. यावेळी मुंबई बाल कल्याण समितीच्या ॲड. मनिषा तूळपुळे यांनी अधिनियमातील सर्व नियमाचे विस्तृत मागदर्शन ऑनलाईनप्रणालीद्वारे केले. डॉ. उज्वला सदावर्ते यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना या अधिनियमाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कार्यालयात काम करतांना महिलांनी आत्मविश्वास व सकारात्मकता ठेवून कर्तव्य पार पाडावे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यशाळेचे संचलन महिला बाल विकास अधिकारी रेखा काळम यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी