भोकर| महिला व बालकांसाठी अविरतपणे कार्य करणारी संस्था म्हणून भोकर तालुक्यात वर्ल्ड व्हिजन इंडिया ही संस्था कार्यरत असून तिचा सर्वत्र नावलौकिक झालेला आहे.
तालुक्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी विविध साहित्य भेट देणे असो की महिला व बालकांसाठी जनजागृती अभियान असो ही संस्था नेहमीच अग्रेसर असते. कोरोना काळात हाताला काम नसल्याने हातभार लागावा या उद्देशाने दि.२१ जून रोजी अर्थिकदृष्टीने मागास कुटुंबाना पौष्टिक आहार मिळावा यासाठी तालुक्यातील दिव्यांग, विधवा, अनाथ मुलांना प्रती लाभार्थी ३५०० रुपये प्रमाणे २० लाख रुपयांचे धान्य व धान्यादी साहित्य वाटप केले आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जी. एल. रामोड यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत प्रकल्प अधिकारी स्याम बाबू पट्टापू यांनी हे धान्य लाभार्थ्यांना वाटप केले.ऐन पेरणीच्या दिवसात आणि कोरोनाच्या कालावधीत धान्य वाटप केल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झालेला दिसून आला. यासाठी संस्थेचे प्रकाश, इमा गावित, विनोद घोडके, करण, प्रविण गाडे आणि सत्येंद्र यांनी परिश्रम घेतले.