पालकमंत्री अशोकराव यांच्या प्रयत्नाला यश
नांदेड| येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय वसतिगृहाची इमारत पाडून नवीन वसतीगृह बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून नवीन तीन मजली इमारत बांधकामासाठी 12 कोटी 67 लाख 93 हजार 837 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आता या महाविद्यालयातील तब्बल 100 विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.
शहरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय परिसरात असलेल्या वसतिगृहाच्या जुन्या इमारतीत 16 खोल्या असुन एका खोलीत 3 अशा 48 विद्यार्थ्यांचीच राहण्याची सोय उपलब्ध आहे. यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेणार्या अन्य विद्यार्थ्यांना शहरातील नातेवाईक अथवा अन्य ठिकाणी भाड्याने खोली घेऊन रहावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून वसतिगृहात निवासासाठी वाढीव विद्यार्थी संख्येची मागणी होती. सदर वसतिगृहाची इमारत अत्यंत जुनी आहे, शिवाय वसतिगृहात 100 विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे वास्तव महाविद्यालयाच्या संबंधितांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
या मागणीची पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्यास यश आले असून शासकीय आयुर्वेद महाविद्यालय वसतिगृहाची इमारत पाडून नवीन वसतिगृह बांधकामासाठी 12 कोटी 67 लाख 93 हजार 837 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आता महाविद्यालयातील 48 ऐवजी तब्बल 100 विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय उपलब्ध होणार आहे.
कांही दिवसांपूर्वीच नांदेडला स्टेट बँकेचे विभागीय कार्यालय, वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ कार्यालय, भोकर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीसाठी 2 कोटी 14 लाख 86 हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याचे वृत्त ताजे असतानाच नवीन वसतिगृह बांधकामासाठी 12 कोटी 67 लाख 93 हजार 837 रुपये मंजूर करुन घेण्यात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना यश आले आहे. भाजपा सरकारच्या गत 5 वर्षाच्या काळातील विकासाचा अनुशेष तसेच प्रलंबित प्रश्न गतीने मार्गी लागत असल्याचे दिसून येत आहे.