ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांची उडतेय दाणादाण
कोरोनाच्या काळात नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात
महिन्याला १३ लक्ष खर्चूनही शहरात घाणीचे साम्राज्य जैसेथेच
मागल्या पाच महिन्यापासून सुरु असलेले लॉकडाऊन हिमायतनगर शहरात शिथिल झाल्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची झुंबड उडत आहे. तर शासकीय कार्यालये, बैंक, आणि भाजीपाला मार्केटमध्ये नागरिकांच्या गर्दीमुळे कोरोनाच्या प्रसार वाढून आज घडीला कोविड केयर सेंटरमध्ये २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातच नगरपंचायत प्रशासनाच्या स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या नांदेडच्या ठेकेदाराने थातुर-माथुर पद्धतीने स्वच्छेतेचे काम केल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत. एवढेच नव्हे तर शहरातील नाल्यांची साफसफाई १५ -१५ दिवस केली जात नसल्याने शहरातील सराफ लाईन, लाकडोबा मंदिर, चौपाटी, जनता कॉलनी परिसरासह इतर भागात अस्वच्छतेचा कळस दिसून येत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून, गुरुवारी झालेल्या अल्प पावसाने नाल्या तुंबून दुर्गंधीयुक्त घाण थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे शहरात ये - जा करणाऱ्या नागरिक, महिलांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढावी लागत आहे. साचून राहणाऱ्या घाण पाण्याने शहर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, यामुळे मच्छरांची उत्पत्ती होऊन डायरिया, डेंग्यू, मलेरिया यासह इतर साथीचे आजार जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी महिन्याला १३ लक्ष खर्चूनही शहरात घाणीचे साम्राज्य जैसेथेच दिसत असल्याने हा पैसे कुठे खर्च होतोय असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. या बाबीकडे जिल्हाधिकारी डॉ.विपीन नांदेड यांनी लक्ष देऊन नपच्या स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांच्या निष्क्रिय कारभाराची चौकशी करावी. आणि शहरवासीयांना संभाव्य साथीच्या आजारापासून मुक्तता देण्यासाठी तातडीने तुंबलेल्या नाल्यांची सफाई करून जागोजाग साचणाऱ्या पाण्यावर कायम तोडगा काढावा अशी रास्त मागणी शहरवासीय नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शहरात कोरोनाचे २३ रुग्ण आढळळे असून, २० शहरात ३ नांदेडला उपचार घेत आहेत. त्यामुळे अगोदरच नगरीत कोरोना विषाणूची भीती निर्माण झाली आहे. त्यात सुरु असलेल्या पावसाळ्यात कोरोना वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शहरात जिकडे तिकडे होणारी गर्दी आणि सोशल डिस्टन्सचा वाजलेला बोजवारा आणि शहरात पसरू लागलेल्या घाणीमुळे कोरोना विषाणूच्या प्रसाराची शकयता नाकारता येत नाही. यास नपचा आणि स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या एजन्सीच्या गुत्तेदाराचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.