पोलीसांनी गोळीबार केलेला विकास हटकर उपचार घेत आहे

 पकडलेल्या दोघांना 3 दिवस पोलीस कोठडी 

नांदेड| लोहा येथून एका अल्पवयीन बालकाला पळवून आणणाऱ्या तिघांना काल दि.7 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी गोळीबार करून पकडले. त्यावेळी एक जखमी झाला, दोघांना पकडले आणि दोन पळून गेले.

पकडलेल्या दोघांना सातवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मुदस्सर नदीम यांनी तीन दिवस, 11 ऑगस्ट 2020 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, पोलीस उपअधिक्षक बाळासाहेब देशमुख, पोलीस निरिक्षक भागवत जायभाये आणि द्वारकादास चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

5 ऑगस्ट रोजी लोहा येथील बालाजी मंदिराजवळ राहणाऱ्या एका अल्पवयीन बालकाला विकास सुभाष हटकर याने मोटारसायकलवर बसवून पळवून आणले. या संदर्भाने तेथे गुन्हा दाखल झाला. 7 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रमाकांत पांचाळ, पांडूरंग भारती आणि पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे, पोलीस कर्मचारी मोतीराम पवार, मारोती तेलंग, बजरंग बोडके, विलास कदम, तानाजी येळगे, बालाजी यादगिरवाड, चालक दादाराव श्रीरामे इतर दोन चालक असे पथक मरळक शिवारात पोहचले त्या ठिकाणी पाच जणांनी एका चार चाकी गाडीमध्ये त्या अल्पवयीन बालकाला बसवले होते. 


पोलीस पथकाला पाहताच आरोपींनी त्यांना आव्हान दिले. त्यावेळी पोलीसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बंदुकीचा धाक दाखवला. तेंव्हा पोलीस पथकातील पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आरोपीमधील विकास सुभाष हटकरच्या उजव्या मांडीवर गोळी झाडली, तो जखमी झाला. त्याच्यासोबतचे इतर 4 जण पळायला लागले तेंव्हा सोयाबीन आणि ऊसाच्या शेतात पाठलाग करत पोलीस पथकाने त्यातील दोघांना पकडले. त्यांचे नावे धोंडीराज उर्फ बंटी सुर्यकांत नवघरे (23)रा.कृष्णा ज्वेलर्स हडको आणि सुरज तुकाराम मामीडवार(23) रा. बंदाघाट अशी आहेत. पळून गेलेल्या गुन्हेगारांची नावे शेख आसीफ छोटू मिया आणि हंबर्डे अशी आहेत. जखमी झालेल्या विकास हटकरवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. द्वारकादास चिखलीकर यांच्या तक्रावरीवरून लिंबगाव पोलीसांनी गुन्हा क्रमांक 95/2020 कलम 307, 353, 143, 148, 149, 506 भारतीय दंड विधान आणि भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 आणि 4/25 नुसार गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास नांदेड ग्रामीण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक बाळासाहेब देशमुख यांच्याकडे आहे. 


आज 8 ऑगस्ट रोजी बाळासाहेब देशमुख त्यांच्यासह पोलीस कर्मचारी रमेश चव्हाण, प्रदीप येमेकर, निवृती रामनबैनवाड, आशिष पिल्लेवाड, गृहरक्षक दलाचे जवान मारोती कन्हाळे, दिपक काकर यांनी पकडलेल्या धोंडीराज नवघरे आणि सुरज मामीडवारला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड.  बी.एम. हाके यांनी मांडलेला युक्तीवाद मान्य करत न्या. मुदस्सर नदीम यांनी दोघांना 11 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. पत्रकार परिषदेत पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगाराला सोडणार नाही आणि सर्व सामान्य माणुस याचे वित्त आणि जीवत रक्षण हाच सर्वात मोठा केंद्र बिंदू असल्याचे सांगितले. शहरात घडलेल्या प्रकरणात कोणीही सहाय्यक, मदतगार असेल तर त्याची गय करणार नाही असे सांगितले.

.....रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.



 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी