नांदेड| विक्की चव्हाण खून प्रकरणातील आज पोलीस कोठडी संपलेल्या तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मुदस्सर नदीम यांनी 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. काल न्यायालयाने एकाला 12 ऑगस्टपर्यंतची पोलीस कोठडी दिलेली आहे.
2 ऑगस्ट रोजी विक्की रामसिंह चव्हाणचा खून झाला. या प्रकरणात विमानतळ पोलीसांनी मुंजाजी बालाजी धोंगडे, सुशील मनोहर गावखोरे आणि केशव शिवाजी नहारे यांना पकडले होते त्यांची 8 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत होती. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी संतोष उर्फ चिंग्या साईनाथ तरटे यास न्यायालयान े12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. आज पोलीस कोठडी संपलेल्या मुंजाजी धोंगडे, सुशील गावखोरे आणि केशव नहारे यांना पोलीस निरिक्षक संजय ननावरे आणि त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी न्यायालयात हजर केले. सहाय्यक सरकारी वकील ऍड. बी.एम. हाके यांनी सांगितले की, या घटनेत कैलाश जगदीश बिघानीया, प्रदीप राम शिरावळे, गंगाधर भोकरे, दिलीप डाखोरे, सोमेश कत्ते, प्रदीप राऊत्रे अशा गुन्हेगारांना शोधायचे आहे. युक्तीवाद ऐकून न्या.मुदस्सर नदीम यांनी तिघांची पोलीस कोठडी 12 ऑगस्टपर्यंत वाढविली आहे.
या प्रकरणातील तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक संजय ननवरे यांनी सांगितले की, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनात काल मरळक शिवारात पकडलेली 4 चाकी गाडी विक्की खून प्रकरणात होती याची तपासणी वैध वैज्ञानिक पध्दतीने करत असून पोलीसांना हीच गाडी विक्की चव्हाण यांच्या खून प्रकरणाच्यावेळी होती असे वाटते. विक्की चव्हाणला मुदखेड रोडवरून उचलून रविनगर, विसावा पार्क सिटीजवळ आणि हस्सापूर शिवार अशा चार ठिकाणी मारहाण करून त्याचे प्रेत हस्सापूर शिवारात फेकले अशी माहिती प्राप्त होत आहे. त्यासंदर्भाने पुराव्यांची साखळी जोडण्याचे काम आम्ही करत असल्याचे संजय ननवरे यांनी सांगितले.