अधिकाऱ्यांनी मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षणातून सर्व माहिती जाणून घ्यावी

अभिनव गोयल यांचे आवाहन 

किनवट तालुक्यातील सर्व मतदान अधिकाऱ्यांनी मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षणातून सर्व इत्यंभूत माहिती जाणून घ्यावी आणि आत्मविश्वासाने मतदान प्रक्रियेला सामोरे जावे, असे प्रतिपादन किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.   

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने
हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत किनवट विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी क्र. २ व ३ यांचे दुसरे निवडणूक प्रशिक्षण रविवारी (ता. ७ ) सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मिडियम स्कूल कोठारी (चिखली ) येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीहीपॅट युनिटचा वापर होत आहे. त्यामुळे सर्वांनी अत्यंत काटेकोरपणे मतदान यंत्राची हातळणी करावी.

याप्रसंगी तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र देशमुख यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे एलसीडी स्क्रीनवर प्रशिक्षण दिले. संगणक तज्ज्ञ तथागत पाटील व संतोष पाटील यांनी त्यांना सहकार्य केले.  प्रशिक्षण व्यवस्थापन व ईव्हीएम कक्षाच्या वतीने नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम, उत्तम कागणे, माधव लोखंडे, मोहम्मद रफीक, डी.एन. गायकवाड, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, अशोक कांबळे, गोविंद पांपटवार, के.डी. कांबळे, स्वामी मल्लीकार्जून आदींनी प्रशिक्षणाचे सुरेख नियोजन केले होते. पहिल्या सत्रात पीपीटी प्रशिक्षण संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात एक ते बारा कक्षामध्ये क्षेत्रीय अधिकारी व मास्टर ट्रेनर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान अधिकारी यांनी ईव्हीएम हाताळणी प्रशिक्षण घेतले. हिंगोली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या हदगाव व किनवट विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्य बजाविणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांना दोन बॅलेट युनिटचा वापर, जोडणी या विषयी स्वतंत्रपणे सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्याकडून जोडणीचे प्रात्यक्षिकही करून घेण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी