नूतन वर्षाच्या शुभमुहूर्तावर ‘टकाटक’चं पहिलं पोस्टर प्रदर्शित

चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षाचा शुभारंभ... साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवशी सर्वत्र नवीन वर्षांचं जल्लोषात स्वागत होत आहे. स्वागत यात्रांच्या माध्यमातून मराठमोळ्या परंपरेचं दर्शन घडवलं जात आहे. याच उत्साहमयी वातावरणात काहीशा वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या ‘टकाटक’ या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

नूतन वर्षाच्या पहिल्या सायंकाळी सोशल मीडियाच्या
माध्यमातून ‘टकाटक’चं फर्स्ट पोस्टर मराठी रसिकांच्या भेटीस आणण्यात आलं आहे. आजवर काही महत्त्वपूर्ण आणि यशस्वी मराठी चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या पर्पल बुल एन्टरटेन्मेंट प्रा. लि., व्ही, पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली ‘टकाटक’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘येड्यांची जत्रा’, ‘४ इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ आणि ‘१२३४’ या करमणूकप्रधान चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या मिलिंद कवडे यांनी ‘टकाटक’चं दिग्दर्शन केलं आहे. मिलिंद कवडे आणि अजय ठाकूर यांनी या चित्रपटाची गंमतीशीर कथा-पटकथा लिहीली असून संवाद संजय नवगीरे यांचे आहेत.

‘टकाटक’च्या पोस्टरच्या जोडीला २८ जून ही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे. या चित्रपटात एका वेगळ्या धाटणीची सेक्स कामेडी प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. फुल टू कमर्शियल चित्रपट असलेल्या ‘टकाटक’मध्ये मनोरंजनाचे सर्व मसाले आहेत. प्रेमकथेसोबतच एक महत्त्वपूर्ण संदेशही ‘टकाटक’च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आजतागायत बऱ्याच आशयघन चित्रपटांची यशस्वी निर्मिती करत मराठी सिनेसृष्टीच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी ‘टकाटक’ची निर्मिती केली आहे. ‘टाइमपास’ फेम प्रथमेश परब या चित्रपटाचं मुख्य आकर्षण असून, त्याच्या जोडीला ऋतिका श्रोत्री ही अभिनेत्री झळकणार आहे. याशिवाय अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर हे कलाकारही या चित्रपटात एका ‘टकाटक’ भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

‘टकाटक’च्या माध्यमातून पुन्हा एकदा एक नवीन विषय काहीशा वेगळ्या शैलीत रसिक दरबारी सादर करण्याचा प्रयत्न केल्याचं मत दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी व्यक्त केलं आहे. ‘टकाटक’सारख्या वेगळ्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांसमोर आणताना खूप आनंद होत असल्याची भावना चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी हजरत शेख (वली) यांनी केली आहे. गीतकार जय अत्रे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून, संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. गायक आनंद शिंदे आणि श्रुती राणे यांनी या सिनेमातील गीतं गायली आहेत.
...... दीनानाथ घारपुरे, मुंबई.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी