किनवट/माहूर| किनवट - माहूर भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय मार्गावरील पुलं वाहुन गेल्याने निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. यामुळे गेल्या १८ तासापासून किनवट तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटला. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. याला जबाबदार या मार्गावरील कंत्राटदार आहे. कारण मागील तीन ते चार वर्षा पासुन या राष्ट्रीय माहामार्गाच्या कामामुळे या परिसरातील नागरीकांना अतोनात त्रास करावा लागतो आहे. यामुळे अनेक प्रवाशांना आपला जिव देखिल गमवाला लागला आहे .
किनवट तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चालु असलेल्या महामार्गाच्या पुलांच्या कामा दरम्यान निर्माण केलेल्या बाजुचे प्रासंगिक पुल वाहुन गेल्याने वाहतुक खोळंबली आहे. यामध्ये किनवट पासुन जवळ असलेला बेंदी तांडा येथिल पुल, गोकुळ नगर येथिल पुल, जलधारा येथिल पुल वाहुन गेल्याने दरम्यानच्या अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर ग्रामिण भागातील नागरीक हे आपले गाव, घर गाठण्यासाठी जोखिम पत्कारुन रेल्वेच्या रुळावरुन, रेल्वेच्या अंडरब्रिज वरुन मार्ग काढत असल्याने एनवेळी एखादी रेल्वे आल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशीच एक घटना शनिवारपेठ येथे घडली असुन, नागरीक रेल्वे रुळ मोटारसायकल सह ओलांडत असतानां अचानक नांदेड ते किनवट येणारी रेल्वे आल्याने नागरीक आपल्या गाड्या सोडुन पळाले.
विशेष म्हणजे काळ नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे किनवट दौ-यावर होते. त्यांच्या वाहनांना देखिल राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा प्रत्यय आला. त्यांचे वाहन देखिल या मार्गावर अडकुन पडले होते. त्यांनी पुढे विदर्भातील उमरखेड तालुक्यातुन मार्ग काढत नांदेड गाठल्याची माहिती प्राप्त होत आहे. कोठारी ते हिमायतनगर दरम्यानचे राष्ट्रीय महामार्गाचे काम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले त्या कंत्राटदाराचा दर्जा अत्यंत खराब असुन, त्याच्या दुर्लक्षितपणामुळे या राष्ट्रीय महामार्गाला काही भागात पांदण रस्त्याचे स्वरुप प्राप्प्त झाले आहे. रस्त्याचे काम करताना ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन केल्या गेले नसल्याने नागरीकांना व प्रशासनिक अधिका-याला नाहकत्रास सहन करावा लागत आहे.
याकरिता मार्ग सुरळीत व्हावा म्हणून भाजपाचे ता अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे केंद्रे यांनी संदेश पाठवुन त्यांना सुचना दिली आहे. किनवट तालुका हा अती दुर्गम तालुका असुन, अशा परिस्थितीत जिल्ह्याशी नेहमी संपर्क तुटतो. जिल्ह्यापासुन १६० की. मी अंतर असल्याने भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला असता किनवट जिल्हा निर्मीती व्हावी ही विविध स्तरावरुन नेहमी मागणी होत आली आहे. परंतु याकरीता सक्षम लढा उभारला जात नसल्याने हा प्रश्न अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे.