डॉ.रमजान मुलानी यांनी कुलसचिव पदाचा पदभार स्विकारला

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सतरावे कुलसचिव म्हणून डॉ.रमजान मुलानी यांनी आज बुधवार, दि.२२ नोव्हेंबर रोजी पदभार स्विकारला. दि.२१ नोव्हेंबर रोजी झालेल्या कुलसचिव पदाच्या मुलाखतीमध्ये त्यांची निवड झाली. गेल्या आठ महिन्यापासून प्रभारी कुलसचिव पदाचा कार्यभार ते सांभाळत होते. आत्ता ते पूर्णवेळ कुलसचिव म्हणून विद्यापीठाचा कार्यभार सांभाळणार आहेत.

अत्यंत गोड आणि मनमिळाऊ स्वभावाचे डॉ.मुलानी हे २००९ पासून विद्यापीठातील जैवतंत्रशास्त्र संकुलामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एकूण सत्तावीस वर्षाच्या त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीमध्ये १८ वर्षे मुंबईमध्ये शैक्षणिक आणि संशोधनामध्ये त्यांनी योगदान दिले आहे. मुंबई येथील रुईया महाविद्यालयामधील वनस्पतीशास्त्र विभागामध्ये त्यांनी संशोधन केले. त्यानंतरचे पुढील संशोधन मुंबई विद्यापीठामध्ये पूर्ण केले. अंधेरी येथील एलयुएमव्ही महाविद्यालयामध्ये २० वर्षे प्राध्यापक म्हणून काम पहिले. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील अमरापूर हे त्यांचे मुळगाव. प्राथमिक शिक्षण येथेच त्यांनी पूर्ण केले. पुढील शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे श्री म्हाळसाकांत महाविद्यालय, शिवनी येथे पूर्ण केले. पदवी शिक्षण कराड येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयामध्ये पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण कोहापूर येथील शिवाजी विद्यापीठामध्ये कमवा व शिका या योजनेचा आधार घेऊन पूर्ण केले.


त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये त्यांच्या १७ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. आणि २३ विद्यार्थ्यांनी एम.फिल. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी दिलेल्या संदेशात ते म्हणाले, “कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या माध्यमातून मला मोठी संधी देण्यात आलेली आहे. या संधीचा मी पूर्णपणे उपयोग घेऊन विद्यापीठ विकासाला चांगली चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहील.” या त्यांच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ.गणेशचंद्र शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवि सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.राजेश्वर दुडूकनाळे, अधिकारी फोरम आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी