पाण्याच्या उपलब्धतेनुसार बाभळी धरणाचे दरवाजे बंद करण्यासाठी समन्वय साधा

माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


नांदेड, अनिल मादसवार- तेलंगणाच्या सिमेलगत असलेल्या बाभळी धरणाचे दरवाजे पाण्याच्या उपलब्धतेनुसार निर्धारित वेळेपूर्वी बंद करण्यासाठी तेलंगणा राज्याशी समन्वय साधावा व या धरणाच्या पाण्याचा महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त उपयोग करण्यात यावा अशी आग्रही मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

खा.अशोकराव चव्हाण यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच एक पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये त्यांनी बाभळी बंधार्‍या संबंधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा उल्लेख केला आहे.
गोदावरी पाणीतंटा लवादानुसार महाराष्ट्रासाठी 60 टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. त्यातील बाभळी बंधार्‍यासाठी 2.74 टिएमसी पाणी आरक्षीत केले आहे. या पाण्याच्या पर्यवेक्षणासाठी केंद्रीय जलआयोग, महाराष्ट्र शासन व आंध्रप्रदेश अधिकार्‍यांची एक समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये 11 ऑगस्ट 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देवून यात तेलंगणा राज्याच्या प्रतिनिधीची भर घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाभळी बंधार्‍याचे दरवाजे दरवर्षी 1 जुलै ते 28 ऑक्टोबर या कालावधीत उघडे असतात. तर 29ऑक्टोबर ते 30 जून या दरम्यान दरवाजे बंद करून 2.74 अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा महाराष्ट्राने वापरावा व दरवर्षी एक मार्च रोजी 0.6 अब्ज घनफूट पाणी तेलंगणा राज्यात सोडावे असे निर्देशीत केले आहे. वास्तवात ज्या दिवशी बाभळी बंधार्‍याचे दरवाजे बंद करण्यात येतात त्या 29 ऑक्टोबरपूर्वीच पावसाळा संपलेला असतो आणि पाऊस नसल्यामुळे बंधार्‍यात निर्धारित प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होत नाही. 

गोदावरी नदीवर बाभळीनंतर समुंद्रापर्यंत केवळ तेलंगणा राज्यात पोच्चमपाड (श्रीरामसागर) हे एकमेव धरण आहे. हे धरण भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीचे पाणी समुद्रात वाहून जाते. याचा फायदा ना तेलंगणा राज्याला ना महाराष्ट्र राज्याला होतो. त्यामुळे 29 ऑक्टोबर ही बाभळीचे दरवाजे बंद करण्याची ठराविक तारीख न ठेवता जर श्रीरामसागर भरले तर गरजेनुसार बाभळीचे दरवाजे बंद करण्याची तारीख दोन्ही राज्याच्या समन्वयातून ठरविण्यात यावी. त्यामुळे  पावसाळ्यात समुद्रामध्ये वाहून जाणारे अतिरिक्त पाणी रोखल्या जाईल व याचा फायदा महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना होईल. दोन्ही राज्यांचे हित लक्षात घेवून या संदर्भात महााष्ट्र शासनाच्यावतीने तेलंगणा राज्याकडे प्रस्ताव पाठवावा व त्यावर सहमती घेवून संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडून बाभळी बंधार्‍याचे दरवाजे उपलब्ध पाणी साठ्यानुसार निर्धारित वेळेपूर्वी बंद करण्याची परवानगी घ्यावी अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी