अर्धवट निकृष्ठ बंधार्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता
हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मंगरूळ - खैरगाव तांडा येथील नाल्यावर अर्धवट व निकृष्ठ पद्धतीने बांधण्यात आलेल्या बंधार्यामुळे नजीकच्या शेतकऱ्यांचे पावसाच्या पाण्याने नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. तर जोरदार पावसाच्या पुराने बंधारा वाहून जाण्याची चिंता शेतकर्यांना वाटू लागली आहे.
जलसंधारण विभागामार्फत नांदेड - किनवट रस्त्यावरील खैरगाव तांडा नजीक असलेल्या अर्जुन लालसिंग राठोड यांच्या शेताजवळून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यावर या उन्हाळ्यात नांदेड येथील एका गुत्तेदरामार्फत तीन बंधारे बांधण्यात आले. या तीन बंधार्यासाठी अंदाजित ३० लाखाची निधी मंजूर झाला होता. शेतकर्यांना सदरील बंधार्याचा सिंचनासाठी उपयोग व्हावा हा उद्दात हेतू असतानाही संबंधित गुत्तेदार व अभियंत्याच्या अभद्र युतीने मूळ उद्देशाला केराची टोपली दाखवीत शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे काम संबंधितानी केले आहे. या महाभागाने संगनमताने बंधाऱ्याच्या कामात टोळक्या दगडाचा वापर करून अल्प सिमेंट वापरून अत्यंत निकृष्ठ पद्धतीने बांधकाम केले आहे. आजघडीला येथील तिन्ही बंधारे लिकेज होत असल्याने नाल्यातील पाणी अडवून न राहता वाहून जात आहे. यामुळे सदर बंधारा पावसाळ्यातील मोठ्या पावसाने वाहून जाण्याची शक्यता परिसरातील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर बंधाऱ्याच्या बाजूच्या काठाची २०० मीटर दगडाने पिचिंग करण्याचे असताना दोन - तीन मीटर दगडे रचून बांधकाम अर्धवट ठेवून बिले उचलण्याचा खटाटोप केला आहे. तसेच नाल्याच्या बाजूने पाण्याच्या प्रवाहाने निर्माण झालेले पौळ बुजून वाहणारे पाणी हे नाल्यात साचून राहावे यासाठी गुत्तेदाराने प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र पैश्याने हपापलेल्या संबंधित गुत्तेदार व अभियंत्याने सर्व नियम धाब्यावर ठेवून थातूर- माथुर बांधकाम करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. या प्रकारामुळे पुराचे पाणी नाल्याच्या बाहेरून बाजूच्या शेतात घुसून जमीन खचण्याची व पिके वाहून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
या बांधकामाची संबंधित वरिष्ठांनी चौकशी करून निकृष्ठ काम करणाऱ्या गुत्तेदार व त्याची देखरेख करणाऱ्या अभियंत्यावर दंडात्मक कार्यवाही करावी. आणि अर्धवट ठेवलेले पिचिंगचे काम पूर्ण करून नाल्याच्या बाजूचा पौळ बुजवून शेतीचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
काम पूर्ण करून नुकसान टाळावे - शेतकरी अर्जुन राठोड
--------------------------
मागील काळात नाल्याच्या बाजूचा पौळ फुटून पाणी शेतात आल्याने पिके नुकसानीत आली. बंधारा बांधताना सांगूनही गुत्तेदाराने चुकीचे काम केले. त्यामुळे पिचिंगचे काम अजूनही अर्धवट ठेवल्याने शेतात पाणी घुसून पिके गालात रुततील. गेल्या वर्षी तर काहीच पिकले नाही यावर्षी सुद्धा छटाक भर कापूस हाती येईल कि नाही..? याची चिंता आहे. या कामाची चौकशी करून अर्धवट काम पूर्ण करून होणारे संभाव्य नुकसान टाळावे असेही मागणी शेतकरी अर्जुन राठोड यांनी केली.