पावसाळा तोंडावर... शेतकरी मशागतीत मग्न
हिमायतनगर(अनिल मादसवार)मृग नक्षत्र सहा दिवसावर एवुन ठेपल्याने बळीराजा अंग झटकून शेती कामाला लागला असून, दरम्यान उन्हाची तीव्रता अधिकच वाढल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने मशागतीची कामे करताना नाके नऊ येत आहेत.
गात वर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यावर्षी शेतकर्यांना रबी हंगाम घेता आला नाही. एवढेच नव्हे तर वादळी वार्यासह अवकाळी पाऊस, गारपीट अशा अनेक नैसर्गिक संकटाने शेतकर्यांना अडचणीत आणेल आहे. त्यावर मात करत मोठय़ा हिमतीने खरीप हंगाम घेण्यासाठी बळीराजा पेरणी पूर्व मशागतीच्या कामात गुंतला आहे. सध्या स्थितीत शेतात नांगरटी, वखरटी, पंजी, कचरा वेचणी आदीसह पावसाचे पाणी जमितीच झिरपावे यासाठी कृषी विभागाच्या ढाळीचे बांध टाकण्याच्या कामांना वेग आला आहे. हि कामे सुरु असताना उन्हाची तीव्रता अधिकच वाढत असल्याने शेतकरी पहाटेच्या प्रहरी कामात गुंतल्याचे चित्र दिसून येत आहे. दुपारी ११ नंतर उन वाढत असल्याने कामे बांध करून विश्रांती घ्यावी लागत आहे. उन्हाची तीव्रता कमी होताच पुन्हा सायंकाळी ५ नंतर कामाला सुरुवात करून अंधार होईपर्यंत कामात गुंतल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
रोहिणी नक्षत्र लागून जवळपास सहा दिवस लोटले असताना अद्याप रोहिण्या बरसल्या नाही. काही ठिकाणी त्यासुद्धा तुरळक प्रमाणात बरसल्याने रोहीण्याचे आगमन होईल कि नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हवामान खाते वेळेवर पाऊस सुरु होणार असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकर्यांना आगामी खरीप हंगाम बाबतची चिंता आत्तापासून सतावत आहे. त्यामुळे यावर्षी मोठा पाऊस होईपर्यंत पेरणीच्या कामाला लागणार नाही असे अनेक शेतकरी उघडपणे बोलून दाखवीत आहेत.