चारा व पाणी टंचाई



शेतीपिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

हिमायतनगर(अनिल मादसवार)विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीचे पात्र दिवाळीच्या काळातच कोरडे ठक पडले असून, परिणामी नदी काठावरील १५ ते २० गावातील पा नि पातळी खालावली आहे. त्यामुळे आत्तापासूनच परिसरातील नागरिकांना चारा व पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हि समस्या सोडविण्यासाठी हिमायतनगर तालुक्यात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री तथा नांदेडचे खा. अशोक चव्हाण व हिंगोलीचे खा.राजीव सातव यांच्याकडे व्यथा मांडून इसापूर धरणातील पाणी सोडण्यासाठी काही शेतकर्यांनी साकडे घातले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खरीप हंगामात पर्जन्यवृष्टी अवेळी व कमी प्रमाणात झाली. त्यामुळे शेतकर्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. एवढे करूनही निसर्गाने अवकृपा केल्यामुळे मुग, उडीद, सोयाबीन हाताचे गेले..आता कपाशीच्या पीकावर आशा असताना ती सुद्धा पाण्याअभावी वाळतानाचे चित्र उघड्या डोळ्यादेखत दिसत असल्याने शतकरी द्विधा मनस्थितीत सापडला आहे. या प्रकारामुळे खरीप हंगामात केलेला खर्च निघाला नाही..रब्बीच्या पिकावर शेतकरी आस धरून बसला असताना थंडी गायब झाली. त्यातच दिवाळीच्या तोंडावर पैनगंगा नदी कोरडी ठाक पडल्याने रब्बीची अशाही मावळली आहे.

खरीप गेला रब्बीचा हंगाम असाच जाणार असल्याचे चित्र दिसत असून, पाणी उपलब्द झाले नाही तर आगामी काळात पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न उद्भवणार आहे. तसेच यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील उस, तूर, कापूस, आणि आगामी रब्बीचा हंगाम पूर्णतः धोक्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येची दाखल घेवून इसापूर धरणातून पैनगंगा नदी पत्रात पाणी सोडून दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी वारंगटाकली येथील माजी सरपंच आबाराव पाटील जोगदंड, लक्ष्मण चित्तलवाड, बालाजी आंबेपवाड, पांडुरंग आडे, दयाळ गिरी महाराज, अवधूत हाके, भगवान कदम, शिवाजी कदम, अवधूत पाटील, प्रकाश हाके, प्रकाश कानोटे, अवधूत गाडेकर, धानोरा येथील सरपंच अण्णा शिंदे, बळीराम देवकते, नितेश जैस्वाल यांच्यासह अनेक शेतकरी यांनी इसापूर धारण येथील प्रशासणाकडे जावून मागणी केली होती. मात्र संबंधितानी शेतकरी व सामान्य जनतेच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

यापूर्वी नदी पत्रात पाणी असते वेळी महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करून शेतकर्यांना वेठीस धरले होते. बहुत प्रयासाने वीजपुरवठा सुरु झाला तर नदीपात्र कोरडे ठक पडले आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची रेल्वे स्थानकावर व हिंगोलीचे खा.राजीव सातव यांची वाळकेवाडी येथे जावून नदी काठावरील काही शेतकर्यांनी भेट घेवून दुष्काळी परिस्थिती, चारा व पाणी टंचाई बाबत साकडे घातले आहे. परंतु यांनीही शेतकर्यांना ठोस आश्वासन न देता तुम्ही सर्व या आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून हा प्रश्न मार्गी लावू असे पोकळ आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांचा वाली कोण..? असा सवाल पुढे येऊ लागला आहे. तर निवडणुकी पूर्वी काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांवर हि परिस्थिती उद्भवली असल्याचेही अनेकांनी बोलून दाखविले आहे.

सध्या नव्याने स्थापन झालेल्या सत्ताधारी भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करून खरीप व रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळवून द्यावा, आगामी काळात निर्माण होणारी चारा व पाणी टंचाईची समस्या सोडवावी, शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी करावा, वीज बिल माफ करावे अशी मागणी मंगरूळ, वारंगटाकळी, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, धानोरा, दिघी, विरसनी, कोठा ज, बोरगडी तांडा, रेणापूर परिसरातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी