व्यंगचित्रकलेचा प्रचार

व्यंगचित्रकलेचा प्रचार-प्रसार वाढविण्याची गरज - पालकमंत्री डी. पी. सावंत 


नांदेड(अनिल मादसवार)व्यंगचित्रांचे रेखाटन ही एक उत्तम कला असून या कलेच्या जोपासनेबरोबरच ती अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रचार-प्रसाराची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी केले.नांदेडच्या कुसूम सभागृहात आयोजित अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाचे उद्धाटन पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार शंकरअण्णा धोंडगे, कार्टूनिस्ट कंबाईनचे अध्यक्ष प्रभाकर वाईरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

संमेलनाच्या निमित्ताने नांदेड नगरीत आलेल्या सर्व व्यंगचित्रकारांचे स्वागत करुन पालकमंत्री सावंत पुढे म्हणाले की, व्यंगचित्र कलेच्या समृध्दीसाठी पुण्या-मुंबईच्या बाहेर प्रथमच नांदेड येथे संमेलन होत असल्याचा आनंद असून यामुळे नांदेडकरांना मान्यवरांची व्यंगचित्रे पाहण्याची, अनुभवण्याची आणि व्यंगचित्रकारांशी संवाद साधण्याची संधी प्राप्त झाली आहे. ही कला अधिकाधिक कलाप्रेमी पर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी लागल्यास राजाश्रय मिळवून देण्याचाही शासनस्तरावर प्रयत्न करेल असेही ते म्हणाले.

व्यंगचित्रकला हे एक अस्त्र असून समाजातील चुकीच्या व अप्रिय गोष्टींवर या कलेच्या माध्यमातून प्रखरपणे प्रकाश टाकला जातो, असे सांगून पालकमंत्री सावंत यांनी व्यंगचित्रकलेला भविष्यात अधिक उजाळा मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असेही आवाहन केले.

स्वागताध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे म्हणाले की, व्यंगचित्रकारांच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होता आल्याबद्दल आभार व्यक्त करुन संमेलनासाठी देशभरातील आलेल्या व्यंगचित्रकारांचे स्वागत केले. व्यंगचित्रकारांच्या माध्यमातून समाजातील व्यंग आपल्या समोर आणण्याची महत्वाची कला व्यंगचित्रकार जोपासत आहेत. ही कला भविष्यातही अधिक वृध्दींगत व्हावी. व्यंगचित्राची ओळख यानिमित्ताने नांदेडच्या रसिकांना उपलब्ध झाली आहे. व्यंगचित्रातील मार्मिक टिका अनेकांना प्रेरणा देते असे सांगून व्यंगचित्रकारांनी बळीराजांचे प्रश्न मांडावेत असेही ते म्हणाले.

कार्टुनिस्ट कंबाईनचे प्रभाकर वाईरकर म्हणाले की, कै. बाळासाहेब ठाकरे यांनी कार्टुनिस्ट कंबाईनची स्थापना करुन व्यंगचित्रकारांना लोकांमध्ये सहभागी होण्याचा संदेश दिला. व्यंगचित्र कला ही अवघड आणि गंभीर कला आहे. यासाठी विषयाचा खुप अभ्यास करावा लागतो. सोशल मिडीयाच्या वाढत्या प्रभावामुळे व्यंगचित्रांचाही प्रसार वाढत आहे. मात्र मुद्रीत माध्यमाकडून व्यंगचित्रांना पुरेसा वाव मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, जेष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे आणि शि. द. फडणीस यांनी पाठविलेल्या शुभ संदेशाचे वाचन राजीव किवळेकर यांनी केले.आयोजक बाबु गंजेवार यांनी प्रास्ताविकपर भाषणात संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करुन नांदेड येथे प्रथमच होत असलेल्या व्यंगचित्रकारांच्या संमेलनामध्ये सहभागी व्यंगचित्रकारांचे स्वागत केले. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते ख्यातनाम व्यंगचित्रकार कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दिप प्रज्वलन करण्यात आले.

संमेलनाच्या स्मरणिकेचे व नांदेडचे व्यंगचित्रकार बाबु गंजेवार यांच्या व्यंगचित्र विषयक 'अक्कलदाढ' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्यंगचित्र स्पर्धेच्या व अर्कचित्र स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. संमेलनाच्या निमित्ताने मधुकर धर्मापुरीकर आणि संतोष धोंगडे यांनी संकलित केलेल्या ख्यातनाम व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे आणि व्यंगचित्रकलेचा इतिहास व प्रवास स्पष्ट करणाऱ्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. या चित्रप्रदर्शनाचे उद्धाटनही पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले.

समारंभास प्रशांत कुलकर्णी, एन. आर. स्वामी, विजय पराडकर, राधा गावडे, लहु काळे, राजेंद्र सरग, विवेक मेहत्रे, रविंद्र बाळापुरे, दिघेवार, आनंद कसंबे, यांच्यासह राज्यभरातून मान्यवर व्यंगचित्रकार तसेच व्यंगचित्रप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय मिस्त्री यांनी केले तर लक्ष्मण संगेवार यांनी शेवटी आभार मानले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी