बाबासाहेबांना आदर्श मानणारी आजची पिढी -NNL


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित राहतात. अपार श्रद्धा या लोकांच्यात असते बाबासाहेबांविषयी आणि संपूर्ण वैचारिक आदर्शवाद अंगी बाळगून आयुष्य जगणारे सच्चे आंबेडकरी अनुयायी पुस्तकांचीच शिदोरी घेऊन घराकडे परतत असतात. हीच परिस्थिती दीक्षाभूमीवरही दिसून येते. या दोन्ही पवित्र स्थळांना आंबेडकरी समाजाच्या इतिहासात फार  महत्त्व आहे. बाबासाहेबांचे विचार आणि भूमिका जगणारे लोक केवळ जायचे म्हणून दीक्षाभूमीला आणि चैत्यभूमीवर दाखल होत नाहीत. तर ते सतत आपल्या घरात, दारात, परिसरात, गावात, शहरात आंबेडकरी विचारधारा रुजविणारे कार्यक्रम आयोजित करीत असतात. कारण आजच्या पिढीला बाबासाहेब समजून घेणं आवश्यक आहे. ते चांगल्या प्रकारे होत नाही ही एक शोकांतिकाच आहे. यामुळे आधीच्या पिढीचे लोक दुःखी होत राहतात. करायचे म्हणून काही कार्यक्रम होतात. रक्तदान, अन्नदान, पणती ज्योत रॅली वगैरे अभिवादनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. हे सर्व कार्यक्रम प्रासंगिक असतात. कधी कधी ते हेतुपुरस्सर असतात.‌ मात्र व्याख्यान, धम्मदेसना, काव्य मैफिल, काही स्पर्धा असे अनेक कार्यक्रम महत्वाचेच असतात. वैचारिक आशय अभिव्यक्तीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे हे कार्य चळवळीचाच एक भाग आहे.

आंबेडकरी चळवळ अनेकस्तरीय आहे हे समजून घेतले जाते. रस्त्यावरची आंदोलने, शिक्षण आणि नोकऱ्या, राजकारण, साहित्य चळवळ, धम्मप्रसार, भारतीय संविधानाचे रक्षण, पत्रकारिता, शासन प्रशासन स्तरावरील अनेक उपक्रम या सर्व कृतीशील जीवनस्तंभांना चळवळीचे आधारस्तंभ मानले जाते. यामधून काही आव्हाने जन्माला येतात. यामुळे सैरभैर होणं साहजिकच आहे. परंतु बाबासाहेब नावाचा एक महाकेंद्रबिंदू या सर्व अनेकरेषीय बिंदूंना एकत्र आणतो. समाजवर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात एकवटून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याचा स्वाभिमानी विचार बाबासाहेबांनीच दिला आहे. यातून समाजाचे एकत्र येणे महत्त्वाचेच आहे परंतु हे एकतेचे सौंदर्य सतत कायमचे टिकून राहण्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात. हे खरे बुद्धीजिवींचे काम आहे. या आंदोलनास समाजाने मोठा पाठींबा देणे अपेक्षित आहे.  शिक्षण आणि नोकरीच्या बाबतीत समाजात बऱ्यापैकी जागृती झालेली आहे. अपवादानेच बिघडलेली पिलावळ वगळता उच्च शिक्षण घेणारी पिढी अत्यंत योग्य पद्धतीने बाबासाहेबांना आदर्श मानून प्रगती करीत असतांना आपल्याला दिसते. राजकारणात आजचे आंबेडकरी नेतृत्व यशस्वी झालेले नाही. कारण समाजाभिमुख नेतृत्व निर्माण न होता स्वार्थी नेतेगिरीचा सुळसुळाट निर्माण झाला. याचे कारण 'घरोघर आंबेडकर व्हावा' हे आहे. फुटीरतेचे कायम ग्रहण लागलेल्या अवस्थेत ही राजकीय चळवळ उभी आहे. काहींनी इतर राजकीय पक्षांचे मांडलिकत्व स्वीकारले आहे तरीही या सर्वांचेच बाबासाहेब हे आदर्श आहेत.

कोणत्याही कार्यक्रमाच्या संदर्भाने तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप धूप आणि पुष्प पूजन करून पुढे पार पडणारा कार्यक्रम म्हणजे बाबाहेबांचा आदर्शवाद जोपासणे नव्हे. आपल्या आदर्शांना त्रिवार वंदन करून मोकळे होणे म्हणजे एकप्रकारे जबाबदारी झटकल्या सारखेच आहे. आंबेडकरी चळवळ पुढे धम्म चळवळ म्हणून प्रवाहित होत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. व्यसनाधीन झालेली आंबेडकरी तरुणांची फौज, शक्ती विधायक कार्याला लागणे गरजेचे आहे. बुद्धाजवळ फुले वाहिले, पंचांग प्रणाम केला की संपले हा काही आदर्श बाळगणे नव्हे. वर्तनात हा आदर्श दिसावा लागतो. धम्म प्रसाराचे काम जोमाने सुरू असणे अपेक्षित आहे.  विविध ठिकाणी अनेक कार्यकर्ते आपल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. या सगळ्या कार्यकलापाचे आदर्श केंद्रबिंदू बाबासाहेबच आहेत. काही चांगले धम्मधर भिक्खू आणि उपासक यांनी या कामी स्वतःला वाहूनच घेतले आहे. या त्यांच्या भूमिकांना लक्षात घेऊन पवित्र अंतःकरणाने मोठ्या प्रमाणावर लोक कार्य करीत आहेत. बुद्ध विहारे धम्मप्रचार आणि प्रसाराचे केंद्र बनावे ही अपेक्षा बहुतांशी पुर्णत्वास जातांना दिसते आहे. गट तट तर सगळीकडेच आहेत परंतु त्यांचेही बाबासाहेबच आदर्श आहेत. त्यामुळे त्यांनी एक होणे, चळवळीत एकत्र नांदणं ही तर काळाची गरजच आहे पण आजच्या पिढी समोरील तो खरा आदर्श ठरणार आहे.

धम्म परिषदा, मेळावे किंवा साहित्य संमेलने आंबेडकरी आदर्शाची विचारधारा पेरण्याचेच काम करतात. ही काही मौजमजेचा किंवा गाठीभेटींचा कार्यक्रम नसतो. त्या दृष्टीकोनातून कुणी पाहत असेल तर ती दृष्टी सम्यक बनवावी लागेल. इथून विचारांची शिदोरी घेऊन जाणारा विचारांची जबाबदारी संपूर्णपणे पेलतो का हे पाहणेही गरजेचे असते. बोलण्यात आणि वागण्यात जर तफावत दिसत असेल तर तो स्वतःला आंबेडकरी अनुयायी बौद्ध उपासक म्हणवून घेण्याला अर्थ उरत नाही. फक्त गाथापठण करुन किंवा ते जगजाहीर उच्चारुन कुणी बौद्ध होत नसतो. तो जन्माने बौद्ध असला तरी कुशल कर्मानेही असावा लागतो. आजही छोट्या मोठ्या अंधश्रद्धांशी लगडून असणाऱ्या शहरी तथा ग्रामीण भागातील लोकांना सतत प्रबोधनाची गरज आहे. निव्वळ भाषणे करुन, ऐकून तसे कार्यक्रम आयोजित करुन त्याचे पुढील योग्य फलधारणेचे सामाजिक अभिसरण योग्य पद्धतीने झाले पाहिजे. अन्यथा पालथ्या घड्यावर पाणी घालून काही उपयोग नाही. 

म्हणून बाबासाहेबांचे सर्वस्पर्शी विचार अंगिकारत असतांना त्या दिशेने आपण स्वतः वाटचाल करणे आणि इतरांना तसे महत्व पटवून देणे तद्वतच आपण स्विकारलेल्या व्रत्तस्थतेचे मोठ्या समुहात रुपांतरण होणेही गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्नांची सुरुवात तर व्हावी लागेल इतकी मनिषा बाळगायला काही हरकत नाही. या संबंधी काही अथवा तसे प्रयत्न झालेच नाहीत असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. आजकाल पोटजातीच्या बाहेर आपण पडत आहोत. ही चांगली सुरुवात आहे. यासंबंधीची दिशा व्यापक रुप धारण करण्यासाठी कुठे तरी धम्म गुरु, सच्चे बौद्ध उपासक उपासिका वा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांचे प्रयत्न कमी पडण्यापेक्षा केवळ पोटजातच नव्हे तर जातींचे समूळ उच्चाटन हेच आपले ध्येय आहे त्या दिशेने ही बांधणी झाली पाहिजे, असे वाटते. म्हणून हे आणि आव्हाने सदृश्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आंबेडकरी अभ्यास गटांनी, मंडळांनी प्रयत्नशील असावे लागते.

बाबासाहेबांना आपले आदर्श मानणारी पिढी आज इतर समाजातही उदयाला येत आहे. ही आशादायक बाब आहे. ज्या पद्धतीने आंबेडकरी समाजासाठी गावा शहरात काही अधिकृत काही अनाधिकृत लढाऊ संघटना मित्र मंडळे कार्यरत असतात तशा त्या इतर समाजातही असतात. त्या आपापले कार्य चोख आणि जोखमीने करतात. कधी कधी त्या एकमेकींच्या विरोधात उभ्या असतात. सामोपचाराने हे वाद मिटवले जाऊ शकतात. प्रत्येक जातींनी आपापले महापुरुष उभे करीत जातीय अस्मिता टोकदार केल्या आहेत. परंतु तरीही सर्व महापुरुषांतील सामायिक अवयव बाहेर घेत आंबेडकरी आदर्शवादाचे समीकरण चिरंतन प्रभाव मांडत असल्याचे दिसते. त्यामुळे गाव पातळीवरच्या सामाजिक संघटना असोत अथवा बाबासाहेबांनीच स्थापन केलेल्या मातृसंघटना असोत यात काम करणारे लोक सहसा आंबेडकरी आदर्श घेऊन वाटचाल करीत असतात परंतु या जुन्या पिढीने आपले वैचारिक वारसदार निर्माण करणे आवश्यक आहे. 

स्वार्थांध राजकारण करणारी पिढी निर्माण होत असेल तर पुढे भयंकर धोका निर्माण होऊ शकतो. संविधान विरोधी, आरक्षणविरोधी लोकांच्या हातात एकहाती सत्ता जाऊन ते भारतीय संविधानावर ओरखडे मारु शकतात. तेव्हा वाम मार्गाला लागलेल्या तरुणाईने ताळ्यावर येणे काळाची गरज आहे. अन्यथा येणारे पुढील दिवस भयंकर असणार आहेत. सत्तेची गंडस्थळं आपल्या हाती येणं आणि प्रयत्न करणं आवश्यक आहे. राजकारणात अनेक प्रयोग झालेत; होतील. त्याची चांगली फलनिष्पत्ती प्रयोग यशस्वी होण्यावर अवलंबून आहे. खऱ्या आंबेडकरवादी लोकांना विधानसभा आणि लोकसभांमध्ये किती जागा मिळतात हे फार महत्त्वाचे आहे. म्हणून गाव पातळीपासून विद्यापीठ स्तरापर्यंत एकच ध्येय धोरण आखणे आवश्यक आहे. म्हणजेच आजच्या पिढीने हे एकच लक्षात ठेवावे की, भारतीय लोकशाहीत आंबेडकरी विचारधारेची सशक्त पेरणी होऊन राजकारण यशस्वी केल्याशिवाय प्रबुद्ध भारताची निर्मिती होणार नाही. 

            - प्रज्ञाधर ढवळे, नांदेड,  मो. ९८९०२४७९५३.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी