हिमायतनगरतील वीजचोरी करणाऱ्या ठेकेदाराला महावितरणचे अधिकारी अभय देतायंत का...? -NNL

धनदांडग्यांच्या थकबाकी वसुलीकडे दुर्लक्ष आणि बिलासाठी शेतकऱ्यांना धरले जातेय वेठीस 

वीजचोरीच्या घटनेला १७ दिवस लोटले ना... दंड वसुली.... ना.... पोलीस कार्यवाही


नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहरातील संभाजी नगर भागात दि.१८ नोव्हेंबर २०२२ शुक्रवारी दिवसाढवळ्या महावितरण कंपनीच्या मुख्य वीज प्रवाहावरून आकोडा टाकून पाईपलाईन जोडणीचे काम चोरीच्या पद्धतीने होत असल्याची पोलखोल सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. गेल्या ३ वर्षांपासून होत असलेला चोरीचा प्रकारावर पांघरून घालत संबंधित वीजचोराला नाममात्र लाखाच्या मध्ये दंडाची नोटीस देऊन मोठी वीजचोरी लपविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होतो आहे. परिणामी नियमाने वीजबिल भरणाऱ्या नागरिकांना या ओव्हरलोडमुळे खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागतो आहे. विजेची चोरी करणाऱ्या ठेकेदाराला महावितरणने केवळ अल्प प्रमाणात दंडाची नोटीस दिली, दंड तर वसूल झाला नाही.. मग पोलीस कार्यवाही का..? केली नाही असा प्रश्न सर्वसामान्य समोर येऊ लागला आहे. एकीकडे महावितरणचे अधिकारी धनदांडग्यांच्या थकबाकी वसुलीकडे दुर्लक्ष करून महावितरण कंपनीला डबघाईच्या खाईत लोटता आहेत, तर दुसरीकडे ऐन रब्बी हंगामात बिलासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले जातेय. या सुलतानाच्या कारभाराने बिचारे शेतकरी मात्र मेटाकुटीला येऊन महावितरण कार्यालयाच्या चक्र मारत असल्याचे चित्र सोमवारी दिसले आहे. 


हिमायतनगर शहराचा कायम स्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी 19 कोटीच्या नळयोजनेचे काम एम.टी.फड या गुत्तेदाराकडून केले जात आहे. या कामाला मागील ३ वर्षांपूर्वी सुरुवात झाली, सध्या शहरातील विविध प्रभागात पाइपलाईनचे काम सुरु असून, ती पाईपलाईन टाकण्यासाठी गेल्या ३ वर्षांपासून संबंधित ठेकेदाराने नेमलेल्या सब ठेकेदाराकडून थेट आकोडा टाकून दिवसरात्र वीज चोरी करून पाईप जोडणीचे काम केले जात आहे. हा प्रकार शहरात सुरु असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष का..? दिले नाही .. ठेकदारासोबत अर्थपूर्ण संबंध केले काय..? असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ठेकेदाराला विजेची चोरी करून पाईप जोडणी करताना छत्रपती नगर परिसरात रंगेहात पकडून महावितरण अधिकाऱ्याला याची माहिती दिली होती. 

त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर न येत आपल्या लाईनमन आणि कार्यालयीन कर्मचाऱ्याकडून वीजचोरीसाठी वापरलेले आणि पाईप जोडणीची माशीन व इतर साहित्य जप्त केले होते. खरे पाहता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर उपस्थित होऊन वीज चोरीचा स्थळ पंचनामा करणे क्रमप्राप्त होते. मात्र खाबुगिरीची सवय जडलेल्या महावितरण अधिकाऱ्यांनी वीज पकडून दिलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना ऑनलाईन पंचनामा केला लाखाचा दंड लावला असल्याचे सांगून ठेकेदाराला अभय देण्याचा प्रयत्न चालवीला आहे. कुंपणच जर शेत खात असले तर दाद कुणाकडे मागायची असाच कांहींसा अनुभव हिमायतनगर येथील महावितरण कार्यालयात सुरु असलेल्या कारभारावरून दिसून येत आहे. वीज चोरी झाल्याच्या घटनेला वीस दिवसांहुन अधिकचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही संबंधित वीज चोराकडून महावितरणचे अधिकाऱ्याने वीज चोरी संदर्भात दंड वसुल केला नाही.... ना...पोलीस कार्यवाही केली असल्याची अधिकृतरित्या माहिती दिली नाही..... सामाजिक कार्यकर्त्यांसमोर शहरातील छत्रपती नगर परिसरात आकडा टाकून वीज चोरी करून पाईपलाईन जोडणी करण्याचे साहित्य जप्त केल्यानंतरही हिमायतनगर शहरात पुन्हा पाईपलाईन जोडण्याचे काम रात्रीच्या वेळेत सुरू झाले आहे. 


यासाठी लागणारी रितशीर वीजजोडणी महावितरण कंपनीने अद्याप दिलेली नाही. मग...शहरात सुरु असलेल्या पाईप जोडणीच्या कामासाठी महावितरणच्या अभियंत्याने घर जावई म्हणून गुत्तेदाराला परवानगी दिली काय..? असा प्रश्न नियमानुसार वीज बिल भरणाऱ्या शहरातील नागरिकांतुन विचारला जात आहे. याबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, शहराचे प्रभारी सहाय्यक तथा कनिष्ठ अभियंता पवन भडंगे यांनी वीजचोरी प्रकरणी पंचनामा केला. त्या ठेकेदाराला चोरी प्रकरणी असेसमेंट बिल ८१ हजार ७४५ रुपये तर गुन्ह्यातून मुक्त होण्यासाठी १५ हजार असा एकूण ९६ हजार ७४५ रुपयाचा दंड भरण्याची नोटीस दिली आहे. दिलेल्या मुदतीत दंड भरला नाहीतर पोलीस कार्यवाही करण्याची मागणीसाठी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे तोंडी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून मशीनद्वारे पाईपलाईन जोडणीसाठी वीजचोरी होत असताना केवळ लाखाच्या मध्ये दंड आकारून ठेकेदाराला मोठ्या दंडाच्या रकमेतून सूट देऊन अभियंत्यांनी आपला स्वार्थ तर साधला नाही  ना...? अशी शंका आता येऊ लागली आहे. कारण वीज चोरीचा पंचनामा आपल्या महावितरण मधील दोन कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांनी करून ज्यां कार्यकर्त्यानी वीजचोरी पकडून दिली त्यांना अंधारात ठेऊन केला गेल्याचा आरोप संबंधित तक्रारदाराने केला आहे.  

एकीकडे सर्वसामान्य वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांना नियमावर बोट ठेवून काम करावे लागते असे सांगणारे अधिकारी शहरांमध्ये तीन वर्षापासून होत असलेल्या वीज चोरी प्रकराकडे दुर्लक्ष करण्यासाठी मूग गिळून गप्प बसले होते काय..? असा प्रश्नही आता पुढे येऊ लागला आहे. त्यामुळे हिमायतनगर येथे कार्यरत असलेल्या महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील अभियंत्यांच्या कार्यकाळात झालेल्या वीज बिल वसुली, थकबाकी आणि दुरुस्तीच्या कामाच्या बाबतीमध्ये वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात यावी. तेव्हा हिमायतनगर येथील महावितरण कार्यालयात कशाप्रकारे गोड बंगाल चालविला जातो.... हे सत्य उघड झाल्याशिवाय राहणार नाही असेही नागरिक बोलून दाखवीत आहेत.  हिमायतनगर शहरांमध्ये आणि राष्ट्रीय महामार्गावरील काही निवडक ठिकाणच्या डीपी व खांबाची जागा रातोरात बदलण्यात आली.... खरोखर या ठिकाणाहून डीपी आणि खांब बदलण्यासाठी महावितरण कार्यालयाच्या नियमानुसार त्यासाठीचा आवश्यक असलेला स्थलांतरित करण्याचा कर संबंधितांकडून भरून घेण्यात आला होता का..? याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया सुजाण नागरीकातून व्यक्त केली जात आहे.

रब्बीत महावितरण अधिकारी धरत आहेत शेतकऱ्यांना वेठीस - हिमायतनगर शहर व तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात शेतीची कामे सुरु आहेत, खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बीच्या पिकासाठी मेहनत घेत आहेत. शेतकऱ्यांनी घेतलेल्या गहू, हरभरा, करडई, सूर्यफूल, सोयबीन, ज्वारी आदी पिकांना पाणी देणे आवश्यक असताना मात्र ऐन रब्बीच्या काळात महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करून वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. एककीकडे हिमायतनगर शहरातील नगरपंचायत आणि इतर धनदांडग्याकडे लाखोंच्या प्रमाणात वीज बिल थकलेले असताना ते वसुली करण्यास टाळाटाळ करून शेतकरी वर्गाना मात्र वीजबिलासाठी त्रस्त करून सोडत आहेत. त्यामुळे हिमायतनगर येथील उपकार्यकारी अभियंता अंतर्गत काम करणाऱ्या अभियंत्याच्या नावाने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी बोटे मोडत आहेत.  

मागील वर्षी हिमायतनगर शहरातील रेल्वे वसाहतीच्या कामासाठी विजेची चोरी केली जात होती. हा प्रकार ३ वर्षांपासून सुरु असताना स्थानिक अभियंत्यांनी कोणतीही परवानगी अथवा अधिकृत वीज जोडणी दिली नव्हती. शहरातील जागरूक नागरिकांनी हि वीजचोरी पकडून दिल्यानंतर आणि पत्रकारांनी पाठपुरावा केल्यानंतर संबंधित वीजचोरांवर १८ लाखाच्या दंडाची कार्यवाही करण्यात आली होती. एव्हडेच नाहीतर तर त्या गुत्तेदारावर एफआयआर देखील झाला होता. त्यानंतर देखील सबंधित वीजचोराने नाममात्र रक्कम भरून हे वीजचोरीचे प्रकरण न्यायालयात नेले आहे. त्यामुळे मागील काळात झालेल्या विजचोरीचा अधिकचा भा शहरातील अनेक छोट्या-मोठ्या वीजग्राहकांवर बसला आहे. असाच प्रकार मागील १७ दिवसापूर्वी झालेल्या वीजचोरीबाबत होणार असून, याचाही आर्थिक भुर्दंड महावितरण कंपनी सर्वसामान्य वीजग्राहकांवर लादणार नाही याचा काय..? भरवसा असा प्रश्न वीजग्राहकांना पडला आहे.       

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी