शहरासह भागातील भागातील मटका, जुगार, दारूच्या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याची मागणी
हिमायतनगर। शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे, अवैध दारूविक्री व मटक्याचा धंदा जोमाने सुरू आहे. हा प्रकार सुरू स्थानिक पोलीस प्रशासनाच्या आशिर्वाद आणि खाबूगिरी व्रत्तीमुळे होत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांना व राजकीय पदाधिकारी यांच्याकडून केला जात आहे. हे धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी होत असताना याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर नव्याने उपविभागीय अधिकारी पदाचा पदभार घेतलेल्या डीवायएसपी शफाकत आमना मॅडम यानी हिमायतनगर शहरात चालविल्या जाणाऱ्या मटका अड्ड्यावर धाड टाकून दोघांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाही मूळ शहरात अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, तालुक्याच्या आजूबाजूला तेलंगणा आणि विदर्भ राज्य आहे. त्यामुळे हिमायतनगर शहरातील व्यापारपेठ मोठी असल्याने या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. याचाच फायदा घेऊन काही राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांनी हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील मुख्य गावात त्या त्या भागातील पोलिसांना हाताशी धरून अवैध धंदे सुरू केले आहेत. यामध्ये जुगार, मटका, देशी दारू सह व्याज बट्याचा व्यवसाय विनापरवाना राजरोसपणे चालविल्या जात आहे. त्यामुळे दिवसभर मोल मजुरी करून पोट भरणारे मजुरदार, शेतकरी, युवावर्ग, या व्यसनाच्या अधिन गेले असुन, याचा फायदा हे अवैध धंदेवाले घेत असल्याने गोरगरीब लोकांच्या संसाराची राख रांगोळी होते आहे.
हिमायतनगर शहरातील चौपाटी परिसरात जुगार, मटका तेजीत सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भोकर येथील नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी शफाकत आमना यांच्या पथकाने काल दि 01 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास धाड टाकून मुद्देमालासह बुक्की चालक व मटका घेणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे. हिमायतनगर शहर व परिसरात दिवसरात्र अवैध धंदे सुरू असताना याकडे पोलिसांनी का लक्ष दिले नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. भोकर येथे नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर हिमायतनगर शहर परिसरातील अवैध धंदे बंद झाले होते. दिवाळीचा पर्वकाळ संपताच बंद झालेला जुगार, मटका, विनापरवाना देशी दारू विक्री अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने सुरू झाली आहे.
याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने हिमायतनगर शहरातील चौपाटी परिसरातील एका जुगार अड्यावर धाड टाकून 7 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल व दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बी. डी भुसनुर हे करीत आहेत. आता शहरात आणि शहराला लागून व ग्रामीण भागातील पोटा, कामारवाडी, मंगरूळ, विरसनी, खडकी, सह ईतर भागात सुरु असलेल्या सर्व अवैध धंद्यावर देखील अश्याच प्रकारे धडक कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून केली जाते आहे.