मुंबई| 'समाजजीवनाशी एकरूप होऊन आपल्या लेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा स्वतंत्र प्रतिभेचा, कृतीशील साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ.कोत्तापल्ले यांचा मराठीचे शिक्षक ते कुलगुरू, साहित्य संमेलनाध्यक्ष आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध भूमिका बजावणारे व्यक्तीमत्व हा प्रवास महत्त्वाचा आहे. मराठी साहित्य चळवळ समृद्ध व्हावी यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. यासाठी शासनाच्या विविध समित्यांच्या माध्यमातून काम केले. होतकरू, नवोदित साहित्यिकासाठी मार्गदर्शनसाठी ते आधारवड होते. भूमिका घेऊन लिहिण्याची स्वतंत्र शैली यामुळे त्यांची साहित्य संपदा निश्चितच पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल. अशा आपल्या वैविध्यपूर्ण साहित्यकृतींनी त्यांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले आहे. त्यांच्या निधनामुळे साहित्यिक क्षेत्राची हानी झाली आहे, त्यांच्या सारख्या व्यासंगी आणि कृतीशील साहित्यिकाची उणीव भासत राहील.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!'
डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली
आपल्या लेखनातून समाजमनाची नस अचूक पकडणारा साक्षेपी लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांनी विविध लेखनप्रकारांतून मराठी साहित्य विश्वात स्वतःचा अमीट ठसा उमटविला. एक कवी, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, संपादक आणि अनुवादक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच विद्यापीठांमध्ये मराठी अभ्यास मंडळांच्या माध्यमातून देखील त्यांनी मराठीची केलेली सेवा मार्गदर्शक अशीच आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले डॉ. कोत्तापल्ले आपल्या भूमिकेवर, विचारांवर कायम ठाम राहिले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्यदेखील अतिशय उल्लेखनीय होते. एक उत्तम मार्गदर्शक, प्रशासक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व त्यांच्या निधनाने आपण गमावले आहे.