नांदेड| जिल्हा परिषद शाळांचे शिक्षण गुणवत्ता पूर्ण आहे. शाळाही समृद्ध होत आहेत. पुरेशी संसाधने उपलब्ध होत असताना प्रत्येक विद्यार्थ्याची अध्यापन पातळी वेगवेगळी असते. त्यानुसार शिक्षकांकडून अध्यापन होणे अपेक्षित आहे. अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केली. बाल दिनाच्या औचित्याने जिल्हा परिषदेत सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्ष ठाकूर -घुगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनाच्या औचित्याने पुष्प अर्पण करण्यात आले. स्काऊट गाईडच्या काही विद्यार्थिनींना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी शैक्षणिक गुणवत्ता विकासावर चर्चा करण्यात आली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य, अधिव्याख्याते, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, सविता बिरगे, सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी शैक्षणिक गुणवत्तेवर मंथन केले.
व्ही स्कूल या नावीन्यपूर्ण ॲपचे सादरीकरण प्रफुल्ल शशिकांत आणि ऋतुजा दवे यांनी केले. जळगाव जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग आणि विद्यार्थी विकासाचे नवे प्रयोग या ॲपच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. शिष्यवृत्ती, नवोदय, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी मुलांची तयारी करून घेणे विभागीय आयुक्तांच्या फ्लॅगशिप कार्यक्रमातील सर्व मुद्द्यांकडे विशेष लक्ष देणे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वतीने देण्यात आलेले वर्षभराचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन वर्षा ठाकूर घुगे यांनी केले .
विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खंत व्यक्त केली. उपस्थिती कमी असण्याची कारणे कोणती, त्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल यावर गटशिक्षणाची शिक्षणाधिकारी यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. मुलांची उपस्थिती 100% राहायला हवी यासाठी विशेष लक्ष द्यावे, शाळेत पाण्याची उपलब्धता, शौचालय स्वच्छ असणे, मुलांना बसण्यासाठी फर्निचर, सतरंज्या, झाडांसाठी ट्री गार्ड व्यवस्था करण्याबाबत त्यांनी सूचित केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी यावेळी शैक्षणिक कार्यक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद केला. बैठकीस डायटच्या प्राचार्य जयश्री आठवले, अधिव्याख्याते, सर्व गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.