मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्यासह हजारो महिलांच्या उपस्थिती
नांदेड| लाखो दिव्यांच्या मंद प्रकाशात तेजाळलेला गोदावरीचा परिसर, त्यावर सप्तरंगी रांगोळ्यांचा गालिचा, फटाक्यांची आतिषबाजी आणि केशरी साड्या परिधान केलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्यासह हजारो महिलांच्या उपस्थितीमुळे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी सतत विसाव्या वर्षी आयोजित केलेले गोदावरी गंगापूजन रंगतदार ठरले.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भाजपा नांदेड महानगर लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा व अमरनाथ यात्री संघाच्या वतीने नगीनाघाट नांदेड येथे गोदावरी गंगा पूजनाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला गंगा माता, भारत माता , गुरुनानकजी व सुधाकरराव डोईफोडे यांच्या प्रतिमेचे पूजन वर्षा ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, लंगर साहब गुरुद्वाराचे बाबा सुबेकसिंघ, ज्येष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे व वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन उमरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट करून पुढील वर्षी महिलांनी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करावे असे आवाहन केले. यावेळी वर्षा ठाकूर यांनी आपल्या भाषणातून अंधारातून प्रकाशाकडे जाणा-या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक करून दिलीप ठाकूर हे अनेक संवेदनशील उपक्रम निस्वार्थपणे राबवित असल्याबाबत समाधान व्यक्त केले. प्रवीण साले यांनी मार्गदर्शन करताना हिंदू धर्मात त्रिपुरारी पौर्णिमेचे असलेले महत्त्व सांगून दिलीप ठाकूर हे आयोजित करत असलेल्या ७६ उपक्रमाचा आढावा घेतला.
भाजपा महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य संध्या राठोड यांचे समायोजित भाषण झाले. संतोषगुरु परळीकर यांनी शास्त्रोक्त गंगापूजनचे महत्व विशद केले. सालासर भजनी मंडळाच्या गिरीराज लोहिया, राजेश बच्चेवार, भजनसम्राट एम.गणेशअण्णा ,जगदीश धूत यांनी सवाद्य पाच आरत्या गायल्या. प्रतिष्ठित व्यापारी योगेश जायस्वाल यांच्यातर्फे पाच हजार द्रौण, दिवे व फुलांची व्यवस्था करण्यात आली. पाच वाजता वेळेवर आलेल्या व शिस्तीत बसलेल्या १००० महिलांना माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, अमृता जायस्वाल, अर्चना आशिष काबरा, पूर्वा शोभित जायस्वाल यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.
उत्कृष्ट पूजेची थाळी सजऊन आणलेल्या २१ महिलांची निवड भाजपा महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शीतल भालके, अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष सुषमा ठाकूर व नयना गिरगावकर यांनी केली. या महिलांना मोर बाबा, बाबा हरिसिंग, संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस अशोक धनेगावकर, मंडलाध्यक्ष आशिष नेरलकर, जिल्हा उपाध्यक्ष बागड्या यादव व कामाजी कदम, मंडलाध्यक्ष सूर्यकांत कदम, सुरेश लोट, लायन्स अध्यक्ष शिवा शिंदे, युवती प्रमुख महादेवी मठपती यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. संस्कार भारती तर्फे काढण्यात आलेल्या भव्य रांगोळी सोबत अनेकांनी सेल्फी काढल्या. भाऊ ट्रॅव्हल्स व माय हॉलिडेज द्वारे आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या आठ सहलीचे भाग्यवान सोडतीचे कुपन वितरित करण्यात आले. त्यानंतर महिलांनी आपल्या परिवारातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी गोदावरी पात्रात पळसाच्या द्रोणात असलेले दिवे सोडले.
हे नयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी नगीनाघाट वर प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी धन्यवाद मोदीजी या उपक्रमांतर्गत पंतप्रधानांना पाठविण्यात येणाऱ्या पत्रलेखकांची सोडत काढली असता भाग्यवान ठरलेल्या श्रद्धा दमकोंडवार यांना दिलीप ठाकूर यांच्यातर्फे मोबाईल भेट देण्यात आला. पत्र जमा करण्यासाठी अमरनाथ यात्री संघाचे कोषाध्यक्ष अनिल चिद्रावार व राजेशसिंह ठाकूर यांनी मेहनत केली.नांदेडच्या गंगापूजनाची महती देश पातळीवर पोहोचवणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचलन धीरज स्वामी तर आभार कामाजी सरोदे यांनी मानले.महापालिकेच्या जीव रक्षकांनी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी नदीपात्रात चोख कामगिरी बजावली. वजीराबाद पोलीस स्टेशन तर्फे पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रहणानंतर स्नान करणाऱ्या महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र रूमची व्यवस्था दिलीप ठाकूर यांनी केली होती.
गोदावरी गंगा पूजनाच्या उपक्रमात सुहास पाटील, शशिकांत पाटील, श्रीराज चक्रवार, गणेश कोकुलवार, बालाजी मंदिरचे महंत कैलास महाराज वैष्णव, दिमाकाका देशमुख, शिख सेल जिल्हाध्यक्ष कृपालसिंग हुजूरिया, जसबीरसिंह धुपिया,चंचलसिंघ जट,सुभाष देवकत्ते, गजानन उबाळे, धोंडोपंत पोपशेटवार, दत्तात्रय कोळेकर, शिवाजी पाटील , बालाजी चव्हाण यांच्यासह अनेकांनी हा नयनमनोहर सोहळा अनुभवला . अनुराधा गिराम, अपर्णा चितळे, पुनमकौर धुपिया, विमल शेट्टी, अनिता चिद्रावार,लक्ष्मी पतंगे, प्रगती निलपत्रेवार ,विजया गोडघासे, पूनम चव्हाण, मेघा कोळेकर,नंदा चौहाण, पुजा बिसेन, रेखा मनाठकर,शोभा चौहाण,रत्नप्रभा गोपुलवाड, रंजिता चौहाण ,निलावती हिवराळे, प्रणिता कुलकर्णी, संतोषी चौहाण, यांच्यासह शेकडो महिला केशरी साड्या परिधान केल्यामुळे वातावरण भगवेमय झाले. कार्यक्रम संपल्यानंतर गुरूद्वारा लंगरसाहब तर्फे ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाचा सर्वानी लाभ घेतला.
गोदावरी गंगापुजन यशस्वी करण्यासाठी लायन्स अन्नपूर्णा अध्यक्ष अरुणकुमार काबरा, राजेशसिंह ठाकूर, संदीप छापरवाल, संतोष भारती, कपिल यादव,किरण मोरे,संजय राठोड,गणेश बिरकुरे, प्रदीपसिंह हजारी, विनायक कांबळे, सिताराम क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.दुसऱ्या दिवशी सकाळी महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नगीना घाट परिसर स्वच्छ केला. हरिद्वार व वाराणसी नंतर भव्य प्रमाणात नांदेड येथे होणाऱ्या गंगेच्या आरतीचे सतत वीस वर्ष आयोजन करीत असल्याबाबत दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.