कर्मचारी अधिकचा वेळ देऊन उशिरा पर्यंत काम करीत असल्याने शेतकऱ्यात समाधान
भोकर, गंगाधर पडवळे। जुलै २०२२ ते सप्टेंबर २०२२ पर्यंत सतत झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. हाता तोंडाला आलेली खरीपाची पिके नेस्तनाबूत झाली होती. शेतकऱ्याला दिलासा म्हणून शासनाने हेक्टरी १३ हजार ६०० रुपये प्रमाणे अनुदान घोषित करून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्याचे काम केले.
भोकर तालुक्यातील ३८ हजार ४२८ शेतकऱ्यांच्या अनुदानापोटी ४१ कोटी रुपये १ ऑक्टोबर २०२२ रोजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शहर शाखेत जमा करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे अल्फाबेटिकली "झेड " या आद्याक्षरापासून गावातील शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप बँक कर्मचाऱ्यांनी तातडीने सुरू केले. आतापर्यंत तब्बल १२ हजार शेतकऱ्यांना यशस्वीपणे अनुदानाचे वाटप करण्यात आले असून ६ हजार शेतकऱ्यांनी एटीएम द्वारे आपल्या अनुदानाची रक्कम उचल केली आहे. तसेच विमा वाटपाचे कामही सुरळीत सुरु आहे.अशी माहिती सदरील बँकेचे शाखा व्यवस्थापक नादरे यांनी दिली.
यासाठी बँकेतील वसुली निरीक्षक सोळंके, कॅशियर उमरे, चेतन जाधव,शिवा रामगीरवार, विठ्ठल जाधव आदी कर्मचारी सेवा देत आहेत. बँकेत कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे पीडित लाभार्थी शेतकऱ्यांनी आम्हाला योग्य ते सहकार्य करून शांततेत आपले अनुदान घेऊन जाण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे असे सांगितले. तशेच उर्वरित शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपाचे काम युद्धपातळीवर सुरू असून बँकेतील कर्मचारी रात्री उशिरापर्यंत अनुदान वाटपाचे काम करीत असल्याने शेतकऱ्यातही समाधानाचे वातावरण पसरले आहे.