नांदेड| चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असले तरी, कोणताही चांगला चित्रपट त्याच्या कथेमुळेच लक्षात राहतो. उत्तम पटकथा हे चित्रपटाचे अर्धे यश असते. स्वतःच्या जीवनाशी समांतर विषय निवडून चित्रपटाची पटकथा लिहिली तर ती प्रेक्षकांना नक्कीच भावते, असे प्रतिपादन नवोपक्रम नवसंशोधन व सहाचार्य विभागाचे संचालक डॉ. राजाराम माने यांनी केले.
पुणे येथील फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पटकथा लेखन लघु अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात डॉ. राजाराम माने अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोर्स डायरेक्टर मेधप्रणव पवार, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. अनुराधा जोशी-पत्की, प्रा. कैलास पुपुलवाड, प्रा. राहुल गायकवाड, प्रा. नामदेव बोंपिलवार, प्रा. किरण सावंत यांची उपस्थिती होती.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. ३ ऑक्टोबर पासून मोफत चित्रपट लघुअभ्यासक्रम आयोजित करण्यात आले होते. या मध्ये चित्रपट आस्वाद, स्मार्ट फोन फिल्म मेकिंग, स्क्रीन अक्टिंग आणि चित्रपट पटकथा लेखन असे एकूण चार अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले. यातील शेवटच्या लघु अभ्यासक्रम चित्रपट पटकथा लेखनाच्या समारोप व प्रमाणपत्र वितरण यावेळी करण्यात आले.
फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने नजीकच्या काळामध्ये सर्वांसाठी चित्रपट लघु अभ्यासक्रम आयोजित करण्यात येतील. चित्रपटांमध्ये रुची असणाऱ्या नागरिकांनी यासाठी ललित व प्रयोगजीवी कला संकुलाशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. पृथ्वीराज तौर यांनी यावेळी केले.
या सोहळ्यामध्ये प्रा. मेधप्रणव पवार, विठ्ठल राठोड, पंढरीनाथ, जयश्री भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुराधा पत्की यांनी केले तर प्रा. कैलास पुपुलवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विनायक येवले, अजिझखान पठाण, प्रकाश रगडे यांनी परिश्रम घेतले.