बिलोली/धर्माबाद/नांदेड। नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि देगलूर तसेच धर्माबाद तालुक्यातील गावकऱ्यांनी सीमावर्ती भागातील प्रश्नांच्या संदर्भात राज्य शासनाला लक्ष देण्याचा आग्रह केला आहे. दरम्यान सीमावर्ती प्रश्नावर आवाज उठवणारे समन्वयक दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सर्वात जास्त परिक्षेत्र आणि गावे तेलंगाना सीमेलगत आहेत त्या पाठोपाठ देगलूर आणि धर्माबाद तालुक्यातील गावे आहेत. भाषावार प्रांत रचनेनंतर तेलंगानात जाण्याचा विचार कोरोना या रोगासारखा उग्ररूप धारण करत आहे. करो या मरो च्या भूमिकेत अनेक लोक तयार होतानाचे चित्र दिसून येत आहे. विकासासाठी उपस्थित झालेला विचार आता भावनात्मक बनत चालला आहे. याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी अशा भावनांना विकासाची जोड देण्याची गरज असताना याकडे दुर्लक्ष होतानाचे चित्र दिसून येते.
नेमका याच बाबीचा धागा पकडून तेलंगणातील मुख्यमंत्री सीमावर्ती भागातील समन्वयक यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष भेटीचे निमंत्रण दिले. दरम्यान समन्वयक गंगाधर प्रचंड यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्कात आहेत तर सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याशी भेटूनच पुढील दिशा ठरवणार असल्याचे जाहीर केले. याबाबत माजी आमदार सुभाष साबणे यांच्या समवेत सीमावर्ती भागातील शिष्ठमंडळाची लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्र्याची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार होती. आता लवकरच मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद होणार असल्याचे सूत्राकडून कळाले.
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याची महत्त्वकांक्षी धोरणे, सीमा भागातील प्रश्न सध्या चर्चेचे विषय ठरले आहेत. तेलंगाना आणि महाराष्ट्रातील विकासावरून विगत चार वर्षात मोठे वातावरण ढवळून निघाले होते.सर्वश्री गोविंद मुंडकर, गंगाधर प्रचंड,राजेंद्र पाटील,राजू पाटील शिंदे,, वेंकटराव सिधनोड, लोखंडे आदींच्य पुढाकाराने शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. याप्रकरणी आठ दिवसात व्यापक बैठक होणार असल्याचे प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार तथा प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर यांनी जाहीर केले आहे.