वन्यप्राण्यांनी केलेल्या पिक नुकसानीचे तुटपुंजे अनुदान अन् 'त्या' धनादेशात गंभीर चुक -NNL

देगलूरच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून सावरखेडच्या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा !


नायगांव बा/नांदेड।
वन्यप्राण्यांनी केलेल्या पिक नुकसानीचा योग्यतेने पंचनामा करुनच त्यानुसार आर्थिक मदत देणे अत्यावश्यक असतांनाही तुटपुंजे अनुदान देतांना चक्क 'त्या' धनादेशांवर आकडी व अक्षरी रक्कमेत चूका करुन देगलूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे यांनी सावरखेड येथिल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची जणू एकप्रकारे क्रूर थट्टाच केल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून जिल्हाधिकारी अभिजीत राउत व वनविभागाचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनीच या प्रकरणात तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

प्राप्त माहितीनुसार,नायगांव तालुक्यातील अनेक गांवात वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होण्याचे वाढते प्रमाण असून सावरखेड येथिल शेतशिवारात यंदाच्या सोयाबीन या खरिप पिकांची गत जुलै महिन्यात नासाडी झाल्याने याबाबत देगलूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे यांच्यासह संबधित विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर सदरचा पंचनामा वनविभागाने तातडीने करणे अपेक्षित होते. परंतू,वरिष्ठांच्या आदेशाशिवाय पहाणी व पंचनामा करण्यास स्थानिक वनरक्षकाने असमर्थता दर्शविली.


सातत्याने विनंती व पाठपुराव्यानंतर वनविभागाच्या स्थानिक 'एका' बहुचर्चित वनरक्षकाने पहाणीचा 'देखावा' करतांनाच योग्यतेने पंचनामा करण्याऐवजी स्वतःच पंचनामा तयार करुन यावेळी स्थळ पहाणीकडे पाठ फिरविलेल्या याबाबतच्या पहाणी व पंचनाम्यासाठी अस्तित्वात असलेल्या त्रिसदस्यीय समितीमधील महसूल व कृषी या दोन्ही विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी घेऊन तसा नुकसान भरपाईचा अहवाल वरिष्ठांना सादर करतांना जाणीवपूर्वक वन्यजीवांकडून पिकांचे कमी नुकसान झाल्याचे स्पष्ट केल्यानंतर तो योग्यतेने व परिपूर्ण नसल्याने सावरखेड  येथिल सात नुकसानग्रस्त शेतकरी अवघ्या बाराशे रुपयांच्या आर्थिक मदतीस पात्र ठरले.


एकीकडे तुटपुंजी आर्थिक मदत देतांनाच नियमानुसार ते थेट शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा करणे अत्यावश्यक होते. मात्र ते नियमबाह्यपणे धनादेशाद्वारे देतांना आकड्यात बाराशे अन् अक्षरात मात्र एक हजार अशा रक्कमेची तफावत असतांनाही त्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी,देगलूर यांनी स्वाक्षरी करुन दिलेली असल्याने नांदेड वनविभागाचे उपवनसंरक्षकांना याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून लेखी तक्रार देण्यात आली आहे.

आमदनी अठ्ठाणी अन् खर्चा रुपया !

महत्वाचे म्हणजे वनप्राण्यांकडून नुकसान पिकांच्या रक्कमेव्यतिरिक्त पिक नुकसानक्षेत्रांची छायाचित्रे, कागदपत्रांची जुळवाजुळव, देगलूर कार्यालयात लेखी विनंतीसाठीचा प्रवास,कागदपत्रे त्रुटींची पूर्तता व त्यासाठी पूनश्च सावरखेड,नायगांव व देगलूर त्यानंतर प्रस्ताव मंजूरीसाठी नांदेड असा प्रवास यामध्ये प्रत्येकी किमान दोन हजार रुपये स्वतःकडूनच आमचे खर्च झालेले असून त्यात मिळालेली आर्थिक मदत तुटपुंजी अन् त्या प्राप्त धनादेशातही असलेल्या चूकांच्या दुरुस्तीसाठीचा प्रवास यामूळे आमदनी अठ्ठाणी अन् खर्चा रुपया ! अशा अवस्थेत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया देतांनाच योग्यतेने नुकसान भरपाई मिळावी सोबतच, संबधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेऊन न्याय मिळवू असे नुकसानग्रस्त शेतकरी रमाकांत कदम म्हणाले.

 संबधित दोषींविरुद्ध कारवाई करु - सहा.वनसंरक्षक ठाकूर 

दरम्यान वनविभागाचे कर्तव्यतत्पर सहा. वनसंरक्षक भिमसिंग ठाकूर यांनी या गंभीर प्रकरणात तातडीने दखल घेऊन स्थानिक वरिष्ठांनाही माहिती दिली. तसेच, देगलूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे यांना याबाबत विचारणा करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्यतेने आर्थिक मदत द्यावे असे आदेश दिल्याचे व त्याचबरोबर,संबधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह प्रकरणातील संबंधित दोषींवर लवकरच प्रशासकीय कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी