नवी दिल्ली। आर्थिक दुर्बल घटकांना नोकरी आणि महाविद्यालयातील प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाच्या वैधतेवर मे.सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. १०३व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली आरक्षणाची तरतूद वैध असल्याचा निकाल मे.सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील घटनेपीठाने हा निकाल दिला असून पाच न्यायमूर्तींचा यात सहभाग होता.
केंद्र सरकारने १०३वी घटनादुरुस्ती करुन सवर्ण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षणाची तरतूद केली होती. मे.सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळं देशभरात आर्थिक आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना समाजात सन्मानाने जगता यावे आणि त्यांना शिक्षण आणि नोकरीची संधी प्राप्त व्हावी, यासाठी या घटकाला १० टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. २०१९ मध्ये मोदी सरकारने विधेयक मंजुर केले होते. मात्र, मे.सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात जवळपास ४० याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
मे. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; १० टक्के आर्थिक आरक्षणावर शिक्कामोर्तब
E.W.S. म्हणजे काय?
EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशा व्यक्तींना E.W.S. अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकतं, हे आरक्षण एस.सी., एस.टी., एन.टी. यांच्यासाठी नसून थोडक्यात ओपन कॅटगरीसाठी आहे.
E.W.S.चा फायदा कोणाला होणार?
खुल्या प्रवर्गातील कुटुंबांना याचा लाभ होणार आहे, एस.सी.(S.C.), एस.टी.(S.T.), ओ.बी.सी.(O.B.C.) आरक्षणातील लोकांना या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना नोकरीत व शिक्षणात आरक्षण मिळू शकते, आरक्षणासाठी पात्र व्यक्तीच्या कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा अधिक नसावी, १ हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा जास्त मोठं रहिवासी घराचं क्षेत्र नसावं, महापालिका क्षेत्रातील कुटुंबांचं रहिवासी घराचं क्षेत्र ९०० चौरस फुटापेक्षा जास्त नसावं, गैर नगरपालिका किंवा ग्रामीण भागातील कुटुंबासाठी १८०० चौरस फूट जागेची अट आहे
E.W.S. प्रमाणपत्र कसं मिळवाल?
E.W.S. प्रमाणपत्र मिळवण्यापूर्वी, तुम्हाला E.W.S. चा अर्ज डाउनलोड करावा लागेल. ते भरल्यानंतर, फॉर्ममध्ये विचारलेल्या कागदपत्रांसह ते तहसील कार्यालयात जमा करावे लागतील. तिथून पडताळणी केल्यानंतर तुम्हाला E.W.S. प्रमाणपत्र मिळेल.
कोणती कागदपत्र आवश्यक?
लाभार्थी व त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड, लाभार्थी व त्यांच्या वडिलांची टी.सी.(T.C.) / निर्गम उतारा, राशन कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा पुरावा
(सातबारा, ८अ / फॉर्म १६ / आयकर भरल्याचा पुरावा).
अर्जदार किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्या बाबतचा पुरावा.
स्वघोषणा पत्र, विहित नमुन्यातील अर्ज, ३ पासपोर्ट फोटो.
E.W..S प्रमाणपत्र किती वर्षांसाठी वैध
E.W.S. प्रमाणपत्राची वैधता फक्त १ वर्षांची आहे.