मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाचा उपक्रम
नांदेड। समाजातील तळागाळातील व्यक्ती शासकीय लोककल्याणकारी योजनापासून वंचित राहू नयेत, त्यांच्यात जागृती व्हावी तसेच विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यत पोहोचाव्यात या उद्देशाने रविवार 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वा. नांदेड येथील पीपल्स कॉलेजच्या प्रांगणात शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या महामेळाव्याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमती डी. एम. जज यांनी केले आहे.
या महामेळाव्याचे उद्घाटक व अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश व्ही. न्हावकर तर प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, अभियोक्ता संघाचे अध्यक्ष एस.एम. पुंड, जिल्हा सरकारी वकील रणजित देशमुख यांची असणार आहे.
या महामेळाव्यात तहसिल कार्यालय नांदेड अंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या सेवा व योजना, नवीन रेशन कार्ड योजना, रेशनकार्ड मधील नावात दुरुस्ती करणे, रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, नवीन आधार नोंदणी / दुरुस्ती, आधार कार्ड मध्ये नावात बदल, आधार कार्ड मध्ये जन्म तारखेत बदल, आधारकार्ड मधील पत्ता बदल, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर, वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जातीचा दाखला, मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,
प्रधानमंत्री श्रम-योगी मानधन योजना, आम आदमी विमा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, आयुष्यमान भारत योजना, ई-श्रम , बांधकाम कामगारासाठी विविध योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, 33 टक्के महिला आरक्षण योजना आदी कल्याणकारी योजनाचे स्टॉल शासनाच्या विविध विभागामार्फत लावण्यात येणार आहेत.