नांदेड| 'राष्ट्रचेतना-२०२२' आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात स्पर्धक लावण्यवतीने शृंगारिक लावणीच्या अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी लोकशाहीर वामनदादा कर्डक कला मंचावर लावणी या कलाप्रकाराला प्रेषकांची टाळ्यांची अनं शिट्यांची मोठी दाद मिळाली.
'गेला गर्दीत मारून धक्का' ही सांघिक लावणी ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या कु.कल्याणी कुलकर्णी, दिव्या सूर्यवंशी, श्रुती गीते, अश्विनी खिल्लारे यांनी सादर केली. तर 'या रावजी बसा भावजी' ही लावणी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या कु.तेजस्विनी शिंदे हिने ठसकेबाज सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. 'विचार काय तुमचा डोळे राखून असं का बघता' ही शृंगारिक लावणी नांदेड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या पूजा वाघमारे हिने अप्रतिम सादर केली. महिला महाविद्यालय नांदेडची स्पर्धक वैष्णवी दुधडे हिने असे 'वाजवा की रात्र गाजवा की' ही बहारदार लावणी सादर केली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील स्पर्धक श्रद्धा कांबळे हिची 'तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला' ह्या मराठमोळ्या ठसकेबाज लावणीने प्रेक्षकांना ठेका धरायला लावले. 'मला प्रितीच्या झुल्यात झुलवा आणि इष्कांचा गुलकंद खिलवा' ही शृंगारिक अदाकरांनी नटलेली लावणी नारायणराव चव्हाण महाविद्यालयाच्या भावना शहा हिने सादर केली. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या अदिती केंद्रे हिने 'जाऊ द्या सजना दूर व्हा' ही विरह लावणी सादर करीत शिट्या मिळवल्या. वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयाची विद्यार्थीनी अश्विनी गायकवाड हिच्या लावणीला प्रेक्षकांची दाद मिळाली.
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सल्लागार समितीचे डॉ. माधव जाधव, डॉ. कमलाकर चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर राऊत, डॉ. प्रल्हाद भोमे, डॉ. यादव सूर्यवंशी, डॉ. मा.मा. जाधव, डॉ. राजपालसिंह चिखलीकर, यांची उपस्थिती होती. मुख्य मंचावर जवळपास ४० लावणी स्पर्धकांनी सादर केल्या.