नांदेड| माहूर येथील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा वापस घ्यावा व खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी दबावतंत्र निर्माण करणार्यांवर चौकशी करुन कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांना भेटून केली.
यावेळी दिलेल्या निवेदनात पत्रकार दोसानी यांनी माहूर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवेत होत असलेली हेळसांड व कंत्राटी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल आपल्या लेखनीच्या माध्यमातून आसुड ओढले होते. त्यामुळे चिडून एका कंत्राटी डॉक्टराने आपले राजकीय कौशल्य पणाला लावून पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी गैरकायद्याच्या मंडळींना हाताशी धरुन रस्ता रोको करुन पोलीस यंत्रणेवर दबाव आणला. सरफसराज दोसानी यांच्यावरील खोटा गुन्हा वापस घेवून पोलीस यंत्रणेवर दबाव आणणार्या डॉक्टरची चौकशी करुन कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी मी या संपुर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.
या संदर्भात पोलीसी पध्दतीने कार्यवाही करु, कोणालाही पाठीशी घालणार नाही असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात मराठी पत्रकार परिषदेचे माजी विभागीय सचिव प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर, कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी, उपाध्यक्ष लक्ष्मणराव भवरे, महानगराध्यक्ष विश्वनाथ देशमुख, ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद कांबळे, सुनिल पारडे आदी उपस्थित होते.