धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी कायापालट उपक्रम सुरूच
नांदेड| भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस सेवा पंधरवड्यात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी कायापालट उपक्रमांतर्गत रस्त्यावर फिरणाऱ्या ३६ भ्रमिष्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे व शंभर रुपयाचे बक्षीसी देऊन मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान साकार करण्यासाठी नांदेडकरांतर्फे हातभार लावला. वीस महिन्याअखेर आत्तापर्यंत साडेसातशे पेक्षा जास्त भणंगांचा कायपालट करण्यात आला आहे.
भाजपा महानगर नांदेड व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अन्नपूर्णा, अमरनाथ यात्री संघाच्या वतीने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, लायन्स पूर्व प्रांतपाल दिलीप मोदी, प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांच्या मार्गदर्शनाखाली कायापालट उपक्रम दर महिन्याला राबविण्यात येतो. त्यानुसार लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा चे अध्यक्ष अरुणकुमार काबरा, मंगेश पोफळे , सुरेश शर्मा, संजयकुमार गायकवाड यांनी शहरातून फिरुन वेगवेगळ्या ठिकाणाहून भ्रमिष्ठांना दुचाकी वर बालाजी मंदिर परिसरात आणण्यात आले. स्वंयसेवक बजरंग वाघमारे यांनी सर्वांची कटिंग दाढी केली.
स्नानासाठी स्वच्छ व मुबलक पाण्याची व्यवस्था बालाजी मंदिरचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्यातर्फे करण्यात आली होती. कित्येक महिने अंघोळ न केलेल्या या भ्रमिष्टांना साबण लावून स्नान घालण्यात आले.स्वच्छ होऊन नवीन कपडे घातल्यामुळे त्यांच्या दिसण्यात अमुलाग्र बदल झाला होता . सर्वांच्या चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली.चार तास सुरु असलेल्या कार्यक्रमानंतर बालाजी मंदिरचा परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. गीता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ॲड. चिरंजीलाल दागडिया, अन्नपूर्णाच्या कोषाध्यक्ष सविता काबरा, शिवनरेश चौधरी यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. व्यसनमुक्तीचे डॉ.प्रकाश शिंदे, विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक प्रा. नंदू मेगदे ,भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस अनुराधा गिराम, सलोना चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली.
या दरम्यान एका अकरा वर्षीय मुलगा घरून रागावून त्या ठिकाणी आला. त्याला समजावून त्याचे घर शोधून दिलीप ठाकूर, कैलास महाराज, सुरेश शर्मा, बजरंग दलाचे शशिकांत पाटील यांनी पालकांच्या हवाली केले. पालकांनी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले. यापुढे असहाय्य दिसणारे, कचरा वेचणारे, वेडे ,भिकारी, अपंग व्यक्ती आढळल्यास नांदेड शहरातील नागरिकांनी याची नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी भाजप अथवा लायन्स सदस्यास माहिती द्यावी असे आवाहन संयोजक ॲड दिलीप ठाकूर यांनी केले आहे.स्वच्छता प्रिय असणाऱ्या नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.