हदगाव। साधू-संत येती घरा तोचि दिवाळी दसरा' ही काव्यपंक्ती लिहिण्यामागे खरोखरच चांगला उद्देश असून, संतांमुळेच मानवी जीवन सफल होते. संत हे दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालत असतात. त्यामुळे संतांची संगत असणे गरजेचे असून, मनुष्याने संतांच्या सान्निध्यात राहून त्यांचे विचार-आचार आत्मसात करावेत, असे प्रतिपादन हभप कृष्णा महाराज कार्लेकर यांनी गुरफळी येथील अखंड सप्ताहातील किर्तनात केले आहे.
हदगाव तालुक्यातील गुरफळी (नवी) येथे श्री संत भवानी बापूजी यांच्या सुवर्णमहोत्सवी समाधी उतस्वी सोहळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहातील दि. 4 आक्टोबर रोजी किर्तन सेवा ह.भ.प.कृष्णा महाराज बोंपीलवार यांची झाली. यावेळी त्यांनी सांगितले, की संत हे चंदनासारखे असतात. चंदन झिजून दुसऱ्याला सुगंध देते. अगदी तेच काम संत करीत असतात. ते स्वतः झिजून समाजातील प्रत्येकाला सुख देण्याचे काम करीत असतात. दुर्जन व्यक्तीला सज्जन बनविण्याचे काम हे केवळ संतच करू शकतात. संतांचा महिमा अपार असून, संताचा महिमा सांगण्यासाठी चंदन, परीस, साखर, दिव्याचा दृष्टांत देण्यात येत असतो. त्यामुळे प्रत्येकाने संतांचा सहवास घेतलाच पाहिजे असे कृष्णा महाराज बोंपीलवार यांनी केलेल्या किर्तन सेवेत सांगितले आहे.
या किर्तनात तबल्याची साथ सचिन बोंपीलवार यांनी दिली .यावेळी पुंडलिक महाराज गुरफळीकर,ज्ञानेश्वर माऊली,रंगराव पाटिल,देवानंद सोनटक्के,कैलास सोनटक्के,अकोश पवार,कानेश्वर पवार,दिलीपराव पाटिल ,सुनिल महाराज, रामदास कदम,निळकंठ पवार,श्यामराव पवार ,प्रवीण पवार,नितिन पवार,सतिश पवार, काशीनाथ पवार, सूर्यभान पवार, प्रेमराव पाटिल,भुजंगराव पाटिल, मोतीराम पवार, बाबुराव पवार,दिपक पवार यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.