वाचन प्रेरणा दिन विद्यापीठामध्ये संपन्न ज्ञानासाठी वाचनाला पर्याय नाही..- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL


नांदेड|
मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात अग्नी व चाकाचा शोध हा महत्वपूर्ण मानला जातो भौतिक ज्ञान परंपरेला लिपी आणि कागदाच्या शोधामुळे पुढे गती मिळाली. वाचन आणि लेखन कलेचा शोध हा देखील मानवी समाज बदलात प्रभावी साधन ठरला. आज इंटरनेटमुळे पुस्तकाऐवजी वेगवेगळी माध्यमे जरी उपलब्ध झाली असली तरी मूलभूत ज्ञान प्राप्तीसाठी वाचनाला पर्याय नाही. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोश: लेखन व वाचन संस्कृती या विषयावर आयोजित कार्यशाळेत विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. सदरील कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे हे उपस्थित होते.यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख,रसायनशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. संतोष देवसरकर, डॉ. स्नेहा खोब्रागडे, संयोजक डॉ. संगीता माकोने आदी मान्यवर उपस्थित होते. 

वाचन प्रेरणा दिनानिमित्त वर्षभर काटेकोर उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंग यांनी माझे नंतर ‘ग्रंथ हेच गुरु’ असल्याचे सांगितले. ग्रंथाला गुरु पद आणि देवत्व देणारी ही भूमी आहे. असेही ते म्हणाले. प्रमुख पाहुणे साहित्यिक श्रीकांत देशमुख म्हणाले की, देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढले पण समस्या कमी झाल्या नाहीत उलट समाजात गुंतागुंत वाढत आहे. अशा वेळी समाजाच्या आकलनासाठी वाचन आवश्यक आहे. ग्रंथालयात बसून ज्ञान साधनेत मग्न असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र हे जगातले सर्वश्रेष्ठ चित्र आहे. कारण ज्ञानातून क्रांतीची दिशा कशी निश्चित होते. याचे हे चित्र साक्ष देते. 

विश्वकोश निर्मिती मंडळाची विद्याव्यासंगी सहाय्यक डॉ. स्नेहा खोब्रागडे यांनी कोश लेखना संदर्भात विस्तृत माहिती दिली. अध्यक्षीय समारोप अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. संगीता माकोने यांनी केले.प्रा. शैलेश वाढेर, प्रा. दीपक पानसकर, प्रा. पी. विठ्ठल, प्रा. राहुल पिंजारी, प्रा. गजानन झोरे, डॉ. योगिनी सातारकर यांनी उपस्थिती नोंदिवली. तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कुलसचिव कार्यालयातील मधुकर आळसे, कपिल हंबर्डे, अशोक कत्तेवार, खेमसिंग पुजारी यांनी सहकार्य केले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी