नांदेड, अनिल मादसवार| वाहन चालवताना वाहन चालकाने काळजी घेणे आवश्यक आहे. निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातातून कुटुंबाचे भरून न येणारे नुकसान होते. देशात दरवर्षी वाहन अपघातात मृत्युमुखी पडणारे यांचे प्रमाण वाढत असून युद्धात मृत्यू होणाऱ्या संख्येपेक्षा रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशात दरवर्षी रस्ते अपघातात १.५ लक्ष व्यक्तींचा मृत्यू होतात आणि तेवढेच कुटूंबे पोरकी होतात. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने स्वतःच्या मनावर व वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. असे मत नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी निसार तांबोळी बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले हे होते तर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, मुंबई येथील परिवहन उपायुक्त भरत कळसकर, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर, शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पि. टी. जमदाडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अविनाश राऊत, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, परिवहन अधिकारी संदीप निमसे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम हे उपस्थित होते.
निसार तांबोळी यांना यावेळी वर्ष २०१९ आणि २०२२ मध्ये झालेल्या अपघातांची आकडेवारी सभागृहापुढे ठेवली. देशात दरवर्षी साडेचार लाखांपेक्षा अधिक अपघात होतात आणि या अपघातांमध्ये दीड लाखांपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडतात. रस्ते अपघात हे दीड लाख कुटुंब पोरकी होतात. यामुळे १४ हजार कोटी रुपयांचे देशाचे नुकसान होते. असे तांबोळी म्हणाले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी नांदेड जिल्ह्यातील अपघातांचे आकडेवारी जाहीर केली. नांदेड जिल्ह्यात सरासरी दररोज दोन अपघात होत असून दररोज किमान एक मृत्यू होतो. वर्षाकाठी साडेतीनशे लोक रस्ते अपघातात केवळ नांदेड जिल्ह्यात मृत्युमुखी पडतात. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृतीचे व्यापक आवश्यकता आहे आणि त्यासाठी विद्यापीठाच्या समवेत रस्ता सुरक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. असे कामत यांनी सांगितले.
परिवहन उपायुक्त भरत कळसकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी यावेळी रस्ता सुरक्षा विषयक आपले अनुभव सांगितले व सभागृहाला मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत रस्ता सुरक्षाविषयक कायदे आणि जाणीव जागृती पोहोचवण्यात येईल त्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जातील. असे अध्यक्ष समारोप करताना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश कामत यांनी केले. संदीप निमसे यांनी सूत्रसंचालन तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी आभार मानले. या उद्घाटन सोहळ्यास विद्यापीठातील विविध प्रशासकीय अधिकारी नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील परिवहन अधिकारी, महामार्ग पोलीस अधिकारी, ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, निरनिराळ्या वाहनांचे डीलर, प्राध्यापक, एनएसएसचे विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजिवी कला संकुलाच्या विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ हे पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी पथनाट्यतील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ललित व प्रयोगजिवी संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनुराधा पत्की जोशी यांनी या पथनाट्याचे दिग्दर्शन केले.