हिमायतनगर| नांदेडच्या साईप्रसाद परीवाराने सरसम येथिल अनाथ विजयाच्या विवाहाची जबाबदारी घेत दि. १५ एप्रिल रोजी होणाऱ्या विवाहासाठी कुठलाही गाजावाजा न करता संसारउपयोगी भांडे, लग्न विधीचे सर्व साहित्य लग्नाच्या दहा दिवस अगोदर घरी पोहचवुन सामाजीक जबाबदारी पार पाडली आहे. साईप्रसादने केलेल्या मदतीमुळे विजयाचे लग्न आता थाटामाटात पार पडनार आहे.
सरसम येथील अनाथ विजया विठ्ठल शिंदे हिचे वडील लहान पणीच वारले, त्यानंतर आजी-आजोबा काकांनी सांभाळ केला, कालांतराने आजोबा वारले, घरची सर्व जबाबदारी आजी काकांवर पडली, परीवारात केवळ ५२ आर जमीन आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा मातीच्या कच्च्या घरात ते दिवस काढतात, दरम्यान नात्यातील गजानन उसेवार रा. सावळेश्वर ता. उमरखेड यांचेशी विनाअट विजयाचा विवाह जुळवुन आला . एक मुलगी आपल्या विवाहात काही तरी साहित्य असावे असे स्वप्न बघते. पण काकांची परस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे लग्नाच्या खर्चासाठी उवाजुळव होवू शकत नव्हती. विजयाच्या खडतर प्रवासाची माहिती समन्वयक, दात्यांकडुन नांदेड येथील साईप्रसाद परीवाराला मिळाली.
साईप्रसाद परीवाराकडे कोणी मदतीशिवाय रिकाम्या हाताने परत गेला नसल्याने नेहमी प्रमाणे कोणताही गाजावाजा न करता नांदेडसह देश विदेशातील दानशूर व्यक्तींच्या दायीत्वाने गेल्या तीन महिन्यापासून सुरू केलेल्या बळीराजा चेतना अभियानां अंतर्गत स्वयंसेवक व समन्वयक यांच्या मदतीने दि.५ मंगळवारी सरसम येथे विवाहाच्या दहा दिवस अगोदर गादी, पलंग, राजाराणी अलमारी, सोन्याचे मणीमंगळसूत्र, चांदीचे जोडवे, मिक्सर, ताट, तांब्या असे संसार उपयोगी भांडे व विवाहासाठी लागणारे सर्व साहित्य घरपोच देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. घरी आलेले साहित्य बघुन विजयासह काका परीवाराच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. गरीब अनाथ मुलीच्या विवाहासाठी साईप्रसाद परीवाराने केलेल्या मदतीचे ग्रामस्थांतुन कौतुक होत आहे.