नरक चतुर्दशीचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र -NNL


आश्विन वद्य चतुर्दशीला नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ दिवाळीतील या सणाच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्‍या कृतींमागील शास्त्र या लेखातून पहाणार आहोत.  

1. इतिहास : ‘श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे - पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. 

श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला. 


2. सण साजरा करण्याची पद्धत : 
अभ्यंगस्नान - गुढीपाडवा, दिवाळी इत्यादी सणांना ‘अभ्यंगस्नान’ करावे असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. अभ्यंगस्नान म्हणजे पहाटे उठून डोक्याला आणि शरिराला तेल लावून नंतर कोमट पाण्याने स्नान करणे, शरीराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन (गरम) पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान.

आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात. आघाडा वनस्पती उपलब्ध न झाल्यास देवाला प्रार्थना करून स्नान करावे. व्यक्तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. तिच्या अंगाला शरिराच्या वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे तेल लावण्यात येते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग तिला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवतात. अभ्यंगस्नासाठी उटणे उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी खोबरेल तेलात हळद घालून ते अंगाला लावावे.

अभ्यंगस्नानामुळे होणारे शारीरिक आणि आध्यात्मिक लाभ - त्वचेला नेहमी स्निग्धता असावी लागते, म्हणून तेल लावतात. ऊन पाणी हे मंगल आणि शरीराला सुखदायक आहे; म्हणून ऊन पाण्याने स्नान करतात. तेल लावून नंतर स्नान करण्याने त्वचेला आणि केसांना आवश्यक तेवढाच ओशटपणा रहातो; म्हणून स्नानापूर्वी तेल लावणे आवश्यक आहे. स्नानानंतर तेल लावणे उचित नाही. स्नानामुळे रज-तम गुण एक लक्षांश इतके कमी होऊन सत्त्वगुण त्याच प्रमाणात वाढतात आणि त्यांचा प्रभाव नेहमीच्या स्नानामुळे सुमारे तीन तास टिकतो, तर अभ्यंगस्नानामुळे चार ते पाच तास टिकतो.

यमतर्पण - अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस (रक्त) जिभेला लावतात.

दुपारी ब्राह्मणभोजन घालतात आणि वस्त्रदान करतात. ब्राह्मणभोजन घालणे आणि वस्त्रदान करणे शक्य नसल्यास अर्पणाचा सदुपयोग होईल, अशा ठिकाणी किंवा धार्मिक कार्य करणार्‍या संस्थांना काही रक्कम अर्पण करावी. प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा करतो. 

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

संकलन- श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था,संपर्क- 9284027180


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी