नांदेड| सचखंड हुजूरसाहिब गुरुद्वारा येथे दिवाळीच्या एक दिवस आधी तख्त स्नान सोहळा साजरा करण्यात येतो. तख्त स्थापनेपासून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी (२३ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता अरदास करून जतिंदरसिंघ घागरिया यांनी गोदावरी नदीपात्रातून पाण्याची पहिली घागर आणली.
यावेळी पंच प्यारे बाबा रामसिंग, बाबा ज्योतिदरसिंग, काश्मिर सिंग, संत बाबा बालविंदर सिंघ, जथ्थेदार संतबाबा कुलवंतसिंग यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढत तीन फेऱ्यात हजारो भाविकांनी गोदावरी नदीपात्रातून पाणी आणले. या पाण्याने गुरुद्वाराच्या कळसापासून ते जमिनीपर्यंतचा भाग धुऊन काढण्यात आला.
भाविकांना दर्शनाची संधी : वर्षातून एकदाच श्रीगुरुगोविंदसिंघजी यांच्या शस्त्रांची साफसफाई करण्यात येते. भाविकांनाही दर्शनाची संधी मिळते. या वेळी या सेवेत लहान मुले, महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ.पी.एस. पसरिचा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.