नांदेड| राष्ट्रचेतना-२०२२ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवातील विडंबन या कलाप्रकारातून स्पर्धकांनी सद्याच्या राजकीय परिस्थितीवर विडंबन सादर करीत 'समंद ओके मदी हाय' ही असी हाक दिली. प्रेक्षकांना विडंबन कला प्रकाराने खळखळून हसविले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालय "राष्ट्रचेतना" युवक महोत्सव २०२२च्या जयवंत दळवी मंच क्र. २वर विडंबन हा कला प्रकार सादर झाला. सलीम फेकूबाबा हे विडंबन सर्व प्रथम सादर झाले. कोरोना काळातील विद्यार्थी अभ्यासापासून दुरावत जाऊन तो मोबाईलच्या आहारी गेला याचे विडंबन 'शाळा' या विडंबनातून सादर झाले.
'घंटी वाजली, शाळा सुटली, आत्ता मोबाईलवर अभ्यास कर' विद्यार्थी पुस्तकातला अभ्यास न करता मोबाईलवरील फ्री फायर, पब्जी सारखे खेळ खेळू लागला. याच विडंबनातून लहान मुलांनी बंडखोर, ईडी सारखे प्रश्न पुढे आणले. या कलाप्रकारात मंजू खिस्ते, राम साखरवाड, अमोल पवार, विकास दळवी, समर्थ भालेराव, मीरा निवाळी आदी स्पर्धकांनी भाग घेतला.
तमाशा या विडंबनात पूर्वीचे सरकार जाऊन नवीन सरकार अस्तित्वात येऊन कसा तमाशा झाला, याची प्रचिती या विडंबनातून आली. यामध्ये ऐश्वर्या डावरे, वैष्णवी मुळी, गोयल साखरे, साक्षी सहजराव, संकेत गाडेकर, शुभम गोधडे, आदींनी भाग घेतला.'रुसला गं, बाई रुसला, मला सोडून दुसऱ्या गटात घुसला' या भिकारी सुशिक्षित बेरोजगार या विडंबनातून प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले.
भारतातील दारिद्र, बेकारी, बेरोजगारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असतांनाही संपलेले नाही हे वास्तव चित्र, आंदोलन या विनोदी नाटकातून प्रथमेश मोरे, बालाजी कांबळे, खंडू येडे, वर्षा ससाणे, वैष्णवी आंधळे, दिव्या धोटे, यांनी दाखवून दिले. मंचावर सल्लागार समितीचे डॉ. प्रताप देशमुख, डॉ. व्यंकटी पावडे, डॉ. गोविंद रामदिनेवर, मनीष देशपांडे आदींची उपस्थिती होती.