दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
भोकर, रवी देशमुख। संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांच्या सुर निरागस हो... या गीताने सुरवात झालेल्या आणि भैरवी ने शेवट झालेल्या दिवाळी पहाट च्या कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक गीतांना टाळ्यांच्या गजरात रंगत भरवली. भोकर येथील कैलास गडावर सेवा समर्पण परिवार ने दिवाळी पहाट चे आयोजन केले होते.
मागील तीन वर्षांपासून सेवा समर्पण परिवार सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून दि २२ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजता कैलास गडावर दिवाळी पहाट चे आयोजन केले. या संगीत मैफल चे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील यांनी केले. तर प्रमुख अतिथी म्हणून महंत उत्तम बन महाराज, भोकर विचार विकास मंच चे अध्यक्ष डॉ यु. एल जाधव, शांतीबन महाराज, सेवा समर्पण परिवार चे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात प्रणव पडोळे यांच्या सुर निरागस हो या गीताने झाली. या नंतर आपल्या सुरेल आवाजात शिवकांता पडोळे यांनी प्रभाती सुर नभी रंगते हे गीत गावून रसिकांची दाद मिळवली.
प्रा राजेश ठाकरे अनंता तुला कोन पाहु शके गीताने संगीत मैफल ची रंगत आणखी चढवली. तर शीतल जामगे यांनी राम का गुणगान करीए गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या मैफलीत खरी रंगत भरवली ती प्रा. प्रणव पडोळे व प्रा. राजेश ठाकरे यांनी गायलेल्या कानडा राजा पंढरीचा या गीताने. या गीताला श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देत कार्यालयात आणखी रंग भरवला. या नंतर दिपावली मनाए सुहानी, अबीर गुलाल उधरीत रंग, नंदलाला कृष्ण मुरारी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, कान्हा आन पडी मै तेरे द्वार, माझे माहेर पंढरी, आली माझ्या घरी दिवाळी हे गीत सादर झाले.
शेवटी सर्वात्मका सर्वेश्वरा या भैरवी ने प्रा. राजेश ठाकरे, प्रा. प्रणव पडोळे यांनी कार्यक्रमाची सांगता केली. सहकारी कलावंत म्हणून तबल्यावर परमानंद जाधव, पखवाज वर विकास चौधरी, ऑक्टोप्याड सुरज लोखंडे आणि कि बोर्ड वर चेतन चित्तै यांनी साथ दिली. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन कवी व्यकंटेश चौधरी यांनी केले. या दिवाळी पहाट कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सुरांच्या मैफिल ला शुभेच्छा दिल्या. यावेळी भोकर मधील अनेक जण उपस्थित होते.