कपिल सावळेश्वरकर यांच्या ‘जीवाचे चांदणे’ काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन
नांदेड| कविता करणे सोपे नसते. सर्वांनाच कविता करता येतात, असेही नाही. तेथे भावनांचा मेळ बसावा लागतो. ‘जीवाचे चांदणे’ हा कवितासंग्रह म्हणजे नवख्या चाहुलीतून नव्या नात्यांची बांधणी होताना दिसते, असे प्रतिपादन प्रख्यात कवी व ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांनी काढले.
श्रीकर प्रकाशनातर्फे सिद्ध करण्यात आलेल्या कपिल सावळेश्वरकर यांच्या ‘जीवाचे चांदणे’ कविता संग्रहाचे प्रकाशन लक्ष्मीकांत तांबोळी यांच्याहस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त उपप्राचार्य तथा कवी डॉ.दीपक कासराळीकर, इसाप प्रकाशनचे संचालक दत्ता डांगे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ.श्रीकांत झंवर, निवृत्त मुख्याध्यापक कृष्णाराव कुलकर्णी, संस्कार भारतीचे अध्यक्ष दि.मा. देशमुख सलगरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
साहित्यिक तांबोळी म्हणाले, कवितेची शेवटची ओळ राहून गेलेल्या कवितेची ही सुरुवात आहे. इथे जीवाचं जसं चांदणं आहे, तसंच आठवणीत झुरणं आहे. उन्हाला चांदणं मानणारा हा कवी मातीचं मनही जाणतो... सखीचं सौंदर्य न्याहाळणारं तरुण मनाचं स्पंदन म्हणजे ह्या कविता आहेत. जीवाला चांदणं म्हणणारा कवी तसेच किनार्याचीही आस लागलेली. चंद्र, सूर्य, ग्रह, तारे आकाशी तुडवण्याचे भाष्य करतो यातून त्याच्यातील मोठा आशावाद दिसून येतो. काव्यसंग्रहातील बहुतांश कविता नोंद घेण्यासारख्याच आहेत. त्यामुळे ‘जीवाचे चांदणे’ म्हणजे गझल रचनेचा एक उत्तम नमुना म्हणावा लागेल, असे मत डॉ.दीपक कासराळीकर यांनी मांडले.
जीवाचे चांदणे करून ज्यांनी संस्काराची शिदोरी कपिलला दिली, ज्यांनी अपार कष्ट करून शिकवले, वाढवले त्या माता-पित्याला हा कवितासंग्रह अर्पण करताना आजच्या नवयुवकातील सुसंस्कारित युवक त्यांच्यात दिसून येतो, असे मत इसाप प्रकाशनचे संचालक दत्ता डांगे यांनी व्यक्त केले. श्रीकर प्रकाशनचा ‘श्रीगणेशा’ आणि सावळेश्वर यांचाही हा पहिलाच कवितासंग्रहाचा योग चांगला जुळून आल्याचे त्यांनी नमूद करत सदिच्छा व्यक्त केल्या.
दि.मा. देशमुख यांनी ‘जीवाचे चांदणे’ यात सखीचे सौंदर्य न्याहळणारं तरुण मनाचं स्पंदन आहे, असे निरीक्षण नोंदवत सावळेश्वरकर यांच्यातील काव्यसंग्रहाचे स्वागत होईल, असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकर प्रकाशनचे गिरीश कहाळेकर यांनी केले. प्रकाशन सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बामणीकर यांनी तर आभार प्रदर्शन सौ.उज्वला इनामदार यांनी केले.
कार्यक्रमाला जेष्ठ साहित्यिक सुधाकर गाजरे, ज्येष्ठ समाजसेवक अनंतराव करजगीकर, विजयकुमार कुलकर्णी, संतोष जामकर, समाधान कामठेकर, संतोष पांचाळ, श्रीकांत स्वामी, जोशी काकांडीकर, चंद्रकांत पाटील, अभिजित पांडे, आशीष पांडे, प्रथमेश अपार्टमेंटमधील सहकारी यांच्यासह सावळेश्वरकर यांचे नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.