नायगाव/नांदेड। नांदेड जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या शेत पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन ,कापूस मका ,तूर ,मूग तसेच भाजीपाला आणि फळबागांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे.
राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित जिरायदार शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रुपये मदत जाहीर केलेली आहे. पण नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ८८०० रुपये मदत बँकेच्या खात्यात जमा होत आहे. सरकारच्या घोषणेमध्ये आणि प्रत्यक्षात मदतीमध्ये ही फार मोठी तफावत दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात भ्रमनिरास झालेला आहे. यावर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यामुळे सर्व नियम अटी बाजूला ठेवून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी १३,६०० रुपये मदत द्यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालय मार्फत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना करण्यात आली आहे.
या निवेदनामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षी पिक विमा १००% लागू करावा ही सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर जिल्ह्यातील शेतकऱ्याला घेऊन येणाऱ्या काळामध्ये रयत क्रांती संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर,रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम वडजे,गजानन सरसमकर उपस्थित होते