नांदेड| ज्या कृतीमुळे शांती मिळते, ज्यामध्ये जन्म आहे ना मृत्यू ती अवस्था म्हणजे निब्बाण होय. निसर्गामध्ये महाकाय प्रलय येतो, त्यानंतर शांत वारा वाहू लागतो तीच अवस्था म्हणजे निर्वाण अवस्था होय अशाच प्रकारे कवयित्री विमलताई शेंडे यांच्या जीवनातील दुःखदायी प्रवास म्हणजे त्यांच्या कविता होत. कवयित्री कवितेत म्हणते, ज्याचं जगणं सुंदर, त्याचा मृत्यूही सुंदर तोच या जगाचा सिकंदर... अशा आशयबद्ध त्यांच्या कविता दुःख व वेदनेनंतर शांती प्रस्थापित करतात म्हणजेच निब्बाणाकडे जाताना दिसतात असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका प्रा. संध्या रंगारी यांनी केले.
कवयित्री विमलताई शेंडे यांच्या उजेडाची नाव या कवितासंग्रहाचे दि. ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कुसूम सभागृह, नांदेड येथे भदंत विनयबोधीप्रिय थेरो यांच्या हस्ते प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका प्रा. संध्या रंगारी ह्या होत्या. यवतमाळचे ज्येष्ठ तथा प्रसिद्ध चित्रकार बळी खैरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष गडलिंग, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुप्रिया गायकवाड व समिक्षक प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण यांनी या कवितासंग्रहावर भाष्य केले.
उजेडाची नाव या कवितासंग्रहावर भाष्य करताना सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुप्रिया गायकवाड म्हणाल्या की, लिखाण हे एक शस्त्र आहे. त्या शस्त्राने आपण समाजामध्ये बदल व एका नवीन समाजाची निर्मिती करु शकतो. कवयित्री विमलताई शेंडे लिखीत उजेडाची नाव कवितासंग्रहात मनुष्याला केंद्रबिंदू मानले आहे व त्यांच्या कविता विज्ञानाकडे जाताना दिसतात.
समिक्षक प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण म्हणाले की, समाज आणि संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये साहित्याचे मोलाचे कार्य असते. समाजाला ऊर्जा देऊन दिशा देण्याचे काम साहित्य करत असते. विमलताई शेंडे यांनी त्यांच्या उजेडाची नाव कवितासंग्रहात स्त्रियांचे विदारक वास्तव व त्यांच्या जीवन अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मानवाच्या उत्थानाचा विचार, आत्मटिका आणि विद्रोह या कवितासंग्रहांतील कवितांमधून जाणवतो.
ज्येष्ठ चित्रकार बळी खैरे यांनी उजेडाची नाव या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ आपल्या चिंतनात्मक कलाकृतीतून साकारले असून त्यानिमित्त त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना खैरे म्हणाले की, कवीला जर दुःख झाले तर त्या दुःखातून एका कवितेची निर्मिती होते, त्याचप्रमाणे चित्रकाराला दुःख झाले तर ते दुःख एखाद्या चित्रकृतीतून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न चित्रकार करत असतो. ज्येष्ठ कवयित्री विमलताई शेंडे यांच्या कविता संशोधनात्मक व तत्त्वज्ञान सांगणार्या आहेत.
उजेडाची नाव या कवितासंग्रहाबद्दल बोलताना भदंत विनयबोधीप्रिय थेरो म्हणाले की, साहित्यिक हे प्रामाणिक असतात, संपत्ती किंवा लोकप्रियता मिळविणे हा त्यांचा उद्देश नसतो. आपल्या मनातील भावना व समाजातील वास्तव व्यक्त करणे हा त्यांचा सद्हेतू असतो. असाच एक गौतम बुद्धाच्या काळातील मुद्दा सांगताना भदंत विनयबोधीप्रिय थेरो म्हणाले की, भगवान बुद्ध हे पहिल्या उपदेशामध्ये पंचवर्गीय भिक्खुंना उपदेश करत असताना त्यावेळी कौंडीण्य भिक्खुकडे पाहून म्हटले की, कौंडीण्य यास विमलदृष्टी प्राप्त झाली आहे. कौंडीण्य यांनी गौतम बुद्धांनी केलेल्या उपदेशातून त्यांच्या विमलदृष्टीने जे घ्यावयाचे होते म्हणजेच चांगले ते घेतले आणि नको असलेले सोडून दिले. त्याचप्रमाणे विमलताई शेंडे यांनी चांगल्या बाबी हेरुन त्या उजेडाची नाव या कवितासंग्रहात घेऊन समाजाला एक नवी दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ कवयित्री विमलताई शेंडे म्हणाल्या की, स्वतःला शोधताना व या शोध मोहीमेत मला जाणवलं, ज्या संवेदना मला आल्या त्या शुद्ध व सत्य भावना म्हणजेच माझ्या उजेडातील नाव या कवितासंग्रहातील कविता होत असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. मंदाकिनी विजय माहुरे यांनी केले. प्रास्ताविक अक्षरोदय साहित्य मंडळाचे अध्यक्ष मारोती मुंडे यांनी केले तर आभार सदानंद सपकाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्चरल असोसिएशन नांदेडचे सचिव डॉ. विजयकुमार माहूरे यांच्यासह सिद्ध नागार्जुन मेडिकल असोसिएशन, नांदेड, इसाप प्रकाशन नांदेड व अक्षरोदय साहित्य मंडळाचे मारोती मुंडे व चंद्रकांत चव्हाण आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.