स्वारातीम 'राष्ट्रचेतना-२०२२' आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे थाटात उदघाटन -NNL

युवकांनी तंत्रज्ञान क्षेत्रात झेप घेऊन राष्ट्रविकास साधावा - डॉ. प्रवीण मेहता

स्वारातीम 'राष्ट्रचेतना-२०२२' आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे थाटात उदघाटन


नांदेड|
कोणतेही तंत्रज्ञान हे राष्ट्राच्या उन्नतीसाठी सन्मानासाठी महत्त्वाचे असते. ज्या राष्ट्राचे सरंक्षण तंत्रज्ञान प्रगत असतो तो देश जगात बलाढ्य देश म्हणून नावलौकिक कमावतो. युवकांनी तंत्रज्ञान क्षेत्रात झेप घेत राष्ट्रविकासासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन डी.आर.डी.ओ. माजी महासंचालक डॉ. प्रवीण मेहता यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅंपस, विष्णुपुरी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्राचेतना - २०२२" या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पठारे, सिने अभिनेता आदिनाथ ठाकरे, प्रसिद्ध नृत्यांगना सुधा कांकरिया, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचाकल डॉ. सूर्यप्रकाश जाधव, स्वागताध्यक्ष संजय पवार, डॉ. विजय पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, नवउपक्रम व नवसंशोधन साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पठारे यांनी युवकांनी आपले ध्येय निश्चित करतांना राष्ट्र उभारणीसाठीही योगदान गरजेचे असून आजचा युवक हा उद्याच्या संपन्न राष्ट्राचा निर्माता असल्याचे त्या म्हणाल्या.


प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे युवकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, नांदेडशी माझे नाते हे कायमचे राहणार आहे, नांदेडकरणांनी मला भरभरवून प्रेम दिले, त्यामुळे मी "पाणी" चित्रपट निर्माण करू शकलो. प्रेमानी कुठलीही गोष्ट साध्य करता येते. जग ही जिंकता येते,या असेही यावेळी म्हणाले. 
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. उद्धव भोसले म्हणाले की, युवक महोत्सवातून अनेक कलावंत घडत असतात. आज घडीला चित्रपट, टी. व्ही. सीरियलमध्ये युवकांना संधी मिळत आहे. युवकांनी विद्यार्थी दशेत सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम, सामाजिक जाण ठेवणे गरजेचे असल्याचे म्हणले. युवक महोत्सव हा विद्यार्थी कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सुरु झाला आहे. सूत्रसंचालन डॉ. विश्वधार देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. ओमप्रकाश दरक यांनी मानले. 

युवक महोत्सवातील पोवाड्यातून सामाजिक व ऐतिहासिक चेतना


राष्ट्रचेतना-2022 या अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात लोकशाहीर वामनदादा कर्डक या मुख्य मंचावर स्पर्धकांनी पोवाडा या कलाप्रकारातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे आणि महापुरुषांची गौरवगाथा व्यक्त करणारे पोवाडे सादर करीत प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे केले.

महात्मा बसवेश्वर लातूरच्या विद्यार्थ्यांनी गाथा बळीराजाची हा पोवाडा सादर करीत शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्न समोर आणला. नम्रता वाघमारे, स्वाती स्वामी, उर्मिला काळे, ज्ञानेश्वरी माळी, मानसी मन शेट्टी, अनघा मुळे यांनी हा पोवाडा सादर केला .तर एमजीएम महाविद्यालय नांदेडच्या कलावंतांनी स्त्रीभ्रूण हत्या या सामाजिक ज्वलंत प्रश्नावर पोवाडा सादर केला. त्यामध्ये मधुरा महाजन, वैष्णवी घुगे, सेजल बंडेवार, राधिका पायरे, अक्षदा उगले, रोहिणी यांनी हुबेहूब वेशभूषेत हा पोवाडा सादर केला महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या विश्वनंदा नरवंशी, वैष्णवी स्वामी, संघर्ष गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून रोमांच उभे केल. पोवाडा या कलाप्रकारात कलावंतांनी राष्ट्र चेतना जागवणारे पोवाडे सादर करत आणि ऐतिहासिक घटना सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

मूक अभिनयातून महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फुलविला देशभक्तीचा मळा..!

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ग्रामीण पाॅलिटेक्निक टेक्निकल कॉलेज नांदेड येथे सुरू असलेल्या विद्यापीठ स्तरीय युवक महोत्सवात मूक अभिनय सादर करीत आपल्या दमदार अभिनयाने भक्तीचा मळा फुलविला. याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कला गुणांना वाव देण्यासाठी दर वर्षी युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून, या वर्षीचा युवक महोत्सव ग्रामीण पाॅलिटेक्निक महाविद्यालयात सुरू आहे. या महोत्सवाचा पहिला दिवस महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गाजविला. 

जयवंत दळवी नाट्य मंचावर महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मूक अभिनय सादर केला. यामध्ये राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेमाचे उत्तम उदाहरणे विद्यार्थ्यांनी सादर केली. यामध्ये महात्मा गांधी यांचा अहिंसावादी विचार, शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव  यांचे बलिदान, स्वातंत्र्यानंतर भारताने केलेली प्रगती तसेच पाकिस्तानवर मिळविलेल्या कारगिल विजयाचे भव्यदिव्य सादरीकरण करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांनी तयार केलेल्या अग्निबाणाचे ऐतिहासिक उड्डाणही दाखविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या नाट्यकृती मध्ये अमोल बनसोडे, राहूल कांबळे, राम पाटील, ज्ञानेश्वर श्रीरामे, भागवत भोसले, प्रशांत काळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना संघ प्रमुख डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब, डॉ.सतीश ससाणे, सौ. सीमा गीते, डॉ. अभिजीत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी