किनवट, माधव सूर्यवंशी| बँकेचे थकीत पिककर्जाचा वाढता बोजा आणि यावर्षी सततच्या पावसामुळे शेतातील पिक वाया गेल्याने हताश झालेला निसपूर येथिल अल्पभूधारक शेतकरी सुनिल निवृती मुंडे (वय वर्ष ३५) यांनी आज (१ सप्टेंबर) सकाळी किटकनाशक औषधी प्राशन करुन आत्महत्या केली. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. किनवट पोलीसात नोंद करण्यात आली.
मयत शेतकरी सुनिल मुंडे यांना चार एक्कर शेत आहे. कापूस व सोयाबीनचा पेरा केला आहे. सततचा पावसामुळे जमिन चिबडून त्यातील पिक वाया गेले. एकीकडे बँकेचे पिककर्ज फेडणे अवघड होत असल्याने कर्ज वाढत आहे.तर दुसरीकडे नैसर्गीक प्रकोप या दुहेरी संकटात हा शेतकरी सापडला. यात चिंताक्रांत होऊन १ सप्टेंबर रोजी सकाही शेतात जाऊन कापसावर वापरणारे किटकनाशक विषारी औषधी प्राशन केले. त्यातच मृत्यू झाला.
मयत सुनिलच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सुनिलच्या मृत्यूबद्धल हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस आणि उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने वेळीच सहकार्य केले. दुपारी ३ वाजताचे दरम्यान निसपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.