नांदेड| शिक्षण दिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर रोजी सर्व शाळेत आम्ही चालू आमची शाळा उपक्रम राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले होते. हा अभिनव उपक्रम जिलहयातील सर्व शाळांमधून राबविण्यात आला. या अभिनव उपक्रमात विद्यार्थीच मुख्याध्यापक व शिक्षक होऊन शाळा चालली.
वसरणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी भेट देऊन पाहणी केली. शाळेनी केलेले नियोजन, स्टाफची निवड, वेळापत्रक व विषयाच्या नियोजनाची त्यांनी पाहणी केली. विद्यार्थी वर्गात शिकवताना शिक्षणाधिकारी विद्यार्थी म्हणून बसल्या होत्या. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर निर्माण होऊन त्यांच्या आत्मविश्वास निर्माण झाल्याचे मत शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच शाळेतील शिक्षकांनी उत्तर नियोजन केल्याबद्दल त्यांचे देखील त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख विश्वनाथ कोरडे, मुख्याध्यापक अंगर जाधव यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.