किनवट, माधव सूर्यवंशी| आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली किनवट शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेला कोट्यावधी रुपयाचा निधी प्राप्त होत आहे. येत्या काही दिवसातच शहरातील विविध प्रभागात रस्ते, नाली बांधकाम त्याचबरोबर महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण व बेल्लोरी येथे मातंग समाजासाठी वस्तीवाढ करून जागा उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.
मागील चार वर्षाच्या कालावधीत आम्ही सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करत आहोत. आ भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली मागील दोनच वर्षाच्या कालावधीत शहराच्या विकास कामासाठी त्यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून किनवट नगर परिषदेला आतापर्यंत सुमारे चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ज्यात बेलोरी, मार्कंडेय मंदिर सुभाषनगर, स्वामी विवेकानंद कॉलनी येथील सभागृह भगतसिंगनगर रस्ता,हेडगेवारनगर रस्ता,गजानन महाराज मंदिर रस्ता,डम्पिंग ग्राउंड रोड, स्वामी समर्थ मंदिर रस्ता, उमरचौक ते गोकुंदारस्ता, माहूर रोड ते द्वारकालॉज रस्ता, प्रभाग क्रमांक 3 मधील 1 कोटी रु चे 4 सिमेंट रस्ते, साई मंदिर येथील सार्वजनिक स्वच्छालय अशा सुमारे 4 कोटी रु च्या कामाचा समावेश आहे.
तर नगर परिषदेने आतापर्यंत विशेष रस्ते अनुदानातून प्रभाग 3 व 6 मध्ये 1 कोटीचे सिमेंटरस्ते, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून साई मंदिराच्या पाठीमागील बाजूस संरक्षण भिंतीसाठी 1 कोटी रु, त्याचबरोबर नागरी सुविधा म्हणून शहरातील प्रमुख व्यासपीठ असलेल्या गोंडराजे मैदानाच्या सुशोभीकरणासाठी 3 कोटी रु,इतर रस्ते विकासासाठी 2 कोटी तर दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 74 लक्ष रु असे अंदाजे 8 कोटी निधी मंजूर केला आहे. आगामी आगामी काळात शहरातील प्रत्येक प्रभागात पक्के रस्ते, नाली, पिण्याचे पाणी व स्वच्छतेसाठी नगरपरिषद कटिबद्ध असून त्यासाठी विकास आराखडा तयार केला आहे.
नवरात्रोत्सवाच्या शुभमुहूर्तावर शहरातून जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच या ठिकाणी आकर्षक आणि भव्य असा पुतळा उभा राहणार आहे. विशेष म्हणजे बेल्लोरी येथील मातंग समाजासाठी वस्ती वाढ करून त्या ठिकाणी त्यांना निवासासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. यासंदर्भात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मातंग समाजाच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचेही नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी बोलताना सांगितले आहे.