उस्माननगर, माणिक भिसे। येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथील रहिवाशी व लष्करी सैन्यदलातील जवान राजेश्वर आनंदराव भुरे (३३) हे सिकंदराबाद येथे कर्तव्य बजावताना त्यांना वीरमरण आले. त्यांचा पार्थिवदेह सिकंदराबाद (हैदराबाद) येथून शिराढोण येथे आणण्यात आले होते. शहीद जवान राजेश्वर भुरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी अनेकांना आपले आश्रू आवरणे कठीण झाले होते.
देशरक्षणार्थ सैन्यदलात दाखल झालेले राजेश्वर भुरे हे इएमई बटालियन मध्ये कार्यरत होते.हैद्राबाद मधील सिकंदराबाद या ठिकाणी कर्तव्य बजावताना शहीद झाले.गेल्या १३-१४ वर्षांपासून इएम ई बटालियन मध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. पाच सप्टेंबर रोजी यांना गोळी छाताडातून घूसून वरच्या बाजूने गेली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.दि.६ सप्टेबर२२ मंगळवारी सकाळी ११ वा.सुमारास शहीद राजेश्वर भुरे यांचे पार्थिव शिराढोण येथे राहत्या घरी आणण्यात आले.पार्थिव पेटी पाहून भल्या भल्याचे कंठ दाटून...भरून आले...पंचक्रोशीतील नातेवाईक, गावातील देशभक्त चाहत्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. यावेळी प्रारंभी पार्थिवाची एका फुलांनी सजवलेल्या तिरंगी झेंडे लावलेल्या ट्रॅक्टर मधून गावातील मुख्य रस्त्यांनी अंत्ययात्रा काढण्यात आली.
यावेळी वंदे मातरम्.... भारत माता की जय.... देशभक्ती गीते.... राजेश्वर भुरे अमर रहे..... या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अंतयात्रेच्या पुढे तिरंगा ध्वज घेऊन तरुण चालत होते. गावातील घरोघरी घरासमोर रांगोळी व फुलांच्या पाकळ्यांची सजविण्यात आले होते. शोभा यात्रेत सहभागी देशभक्तांनी देशभक्तीपर घोषणा देत परिसर दणाणून गेला त्यानंतर स्थानिक पोलीस दलाकडून फायरिंग करून सलामी मानवंदना देण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात, तहसीलदार मुंडे, उस्मान नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजी पांडागळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी सैनिक दलातील आजी-माजी सैनिक प्रशासनातील अधिकारी व गावकऱ्यांनी शहीद जवान राजेश्वर भुरे यांना पुष्पचक्र व फुले वाहून श्रद्धांजली वाहिली यावेळी शहीद जवान भुरे यांना भाऊ ओम भुरे व तीन वर्षांच्या मुलाने अग्नीडाग दिला. शहीद जवान राजेश्वर भुरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद.. आज देशभक्त वीर जवान राजेश्वर भुरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सकाळपासूनच गावातील दुकानदार व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठानने स्वतःहून बंद ठेवून शोभायात्रेत सहभागी झाले होते....वीर जवान यांचा लहान मुलाकडे नागरिक कुतूहलाने पाहत होते...