सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
दरवर्षी हे उत्‍सव नांदेड शहर व जिल्‍ह्यात सर्वत्र मोठ्या उत्‍साहाने साजरे होत असतात. सदर सण-उत्‍सवाचे महत्‍व लक्षात घेता, तसेच उत्‍सव शांततेत पार पडावा आणि जिल्‍ह्यात सर्वत्र कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत रहावी म्‍हणून जिल्‍हा प्रशासनामार्फत आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात येत असते. हे सण उत्‍सव शांततेत पार पडावेत या दृष्‍टीने करावयाची कार्यवाही व उपाययोजनाच्या अनुषंगाने विविध मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्गमीत करण्यात आल्या आहेत. 

मंडळांच्‍या संयोजकांसाठी या आहेत सूचना 

दुर्गा देवींच्‍या स्‍थापने पूर्वी मंडळाच्‍या संयोजकांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त, नांदेड आणि संबंधीत पोलीस स्‍टेशनकडून रितसर परवानगी घ्‍यावी. विना नोंदणी व विना परवाणगी मंडळाने दुर्गा देवींची स्‍थापना करु नये.

मुर्तीची स्‍थापना तसेच दांडीया/गरभा सार्वजनिक रस्‍त्‍यांवर अथवा रहदारीस अडथळा निर्माण होईल अश्‍या ठिकाणी करु नये.

मुर्ती स्‍थापनेची तसेच दांडीया/गरभा खेळण्‍याची जागा आणि परिसर स्‍वच्‍छ असावा. त्‍या ठिकाणी प्रकाशाची भरपूर सोय केलेली असावी. दुर्गा देवीच्‍या मुर्तींच्‍या संरक्षणाची जबाबदारी संबंधीत मंडळाचे अध्‍यक्ष आणि पदाधिका-यांवर सोपविण्‍यात यावी. स्‍थापनेच्‍या ठिकाणी या साठी 24 तास कार्यकर्त्‍यांची चक्राकार पध्‍दतीने नियुक्‍त्‍या कराव्‍यात. 

उत्‍सव कालावधीत वापरण्‍यात येणा-या ध्‍वनिक्षेपकाची परवानगी संबंधीत पोलीस स्‍टेशन येथुन घ्‍यावी. ध्‍वनीक्षेपकाच्‍या आवाजामुळे रुग्‍णास, विद्यार्थ्‍यांस व परिसरातील सर्वसामान्‍य जनतेस त्रास होणार नाही याची दक्षता घ्‍यावी. मंडळाकडून दाखवण्‍यात येणा-या देखाव्‍यामुळे इतर धर्मियांच्‍या भावना दुखवल्‍या जाणार नाहीत, असेच देखावे उभे करावेत. देखावे उभारण्‍यापुर्वी संबंधीत पोलीस स्‍टेशन कडून परवानगी घ्‍यावी. मंडळातर्फे आयोजीत करण्‍यात येणा-या मनोरंजन व सांस्‍कृतीक कार्यक्रमांची तसेच गरभा, दांडीया यासाठीची परवानगी संबंधीत पोलीस स्‍टेशन कडून घ्‍यावी. 

विसर्जन मिरवणूकीत वापरात येणारी वाहने चांगली व सुस्थितीत असावी. त्‍याची तपासणी नांदेड शहरासाठी प्रदेशिक परिवहन अधिकारी नांदेड व तालुक्‍याच्‍या ठिकाणी राज्‍य परिवहन महामंडळ आणि यांत्रिकी विभागांची मदत घ्‍यावी. सर्व महसूल अधिकारी व पोलीस अधिका-यांनी त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रा मध्‍ये शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधीत ठेवण्‍यासाठी एन.सी.सी., स्‍काऊट गाईड, होमगार्ड तसेच शांतता समितीच्‍या सदस्‍यांची मदत घ्‍यावी.उत्‍सव कालावधीत देवींच्‍या स्‍थापने पासून ते विसर्जनापर्यन्‍त साज-या होणा-या सर्व कार्यक्रमामध्‍ये, गरभा, दांडीया यामध्‍ये त्‍यांना सहभागी करुन घेवून कायदा व सुव्‍यवस्‍था परिस्थिती हाताळावी.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी